सर्व व्यवहार बंदच्या आदेशाने नागरिक घरीच : पावसाच्या संततधारेमुळेही एरवी गजबजलेले रस्ते मोकळा श्वास घेतानाचा अनुभव
प्रतिनिधी / बेळगाव
विकेंड लॉकडाऊनमुळे रविवारी सकाळपासूनच शहरात शुकशुकाट पसरला होता. यामुळे निर्मनुष्य झालेले रस्ते सर्वत्र पाहावयास मिळत होते. पावसाची संततधार सुरू असल्याने नागरिकांनी घरीच राहणे पसंत केले. यामुळे एरवी गजबजलेले रस्ते रविवारी मात्र शांत होते. यामुळे पोलिसांनीही रिलॅक्स होत रविवारी आपली सेवा बजावली.
कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी गर्दी होणार नाही याची काळजी जिल्हा व राज्य प्रशासनातर्फे घेतली जात आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी 6 ते 10 या वेळेत जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. शनिवार व रविवारी विकेंड लॉकडाऊन दिवशी सर्व व्यवहार बंद करण्याचे आदेश असल्याने नागरिक घराबाहेर पडले नाहीत. कोरोनाला आळा बसावा हा त्यामागचा उद्देश आहे. मागील विकेंड लॉकडाऊनप्रमाणेच शनिवारी सकाळी 6 वाजल्यापासून विकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली. शनिवारप्रमाणेच रविवारीही बेळगाव शहर व उपनगरांमध्ये सर्वत्र शुकशुकाट व शांतता होती.
फुड डिलिव्हरीला अच्छे दिन
नेहमीच चमचमीत पदार्थ खाणाऱया बेळगावकरांना फुड डिलिव्हरीची सोय करून देण्यात आली आहे. मांसाहारासोबतच शाकाहारी पदार्थ घरपोच मिळत असल्याने ऑर्डर देणाऱयांची संख्या वाढली आहे. यामुळे रविवारी दिवसभरात घरपोच पदार्थ पोहोचविणाऱयांची ये-जा दिसून आली. शहरातील हॉटेलचालकांनी केवळ पार्सल काऊंटर सुरू ठेवल्याने लॉकडाऊनमध्येही नागरिकांना चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेता आला.