7 फूट 8 इंच उंची असणारा व्यक्ती
गिनिज वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये नाव नोंदविणारा अमेरिकेतील सर्वाधिक उंचीचा इगोर वावेकोविंस्कीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन झाले आहे. इगोरची उंची 7 फूट 8 इंच इतकी होती. मूळचा युक्रेनचा असणारा इगोर वयाच्या 7 व्या वर्षी उपचारासाठी अमेरिकेत आला होता. इगोरच्या आईने सोशल मीडियावर त्याचे छायचित्र पोस्ट करत त्याच्या निधनाची पुष्टी दिली आहे.
इगोरचे न्यूयॉर्कच्या रोचेस्टरमध्ये मेयो क्लीनिक रुग्णालयात निधन झाले. इगोरची उंची पिटय़ुटरी ग्लँडवरील टय़ुमरच्या दबावामुळे सातत्याने रिलीज होणाऱया हार्मोन्समुळे वाढत होती. हा टय़ूमर वाढतच असल्याने त्याला अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते.
इगोरला 2010 मध्ये पहिल्यांदाचा अमेरिकेच्या ‘द डॉ. ओझेड शो’मध्ये सर्वाधिक उंचीचा व्यक्ती म्हणून पुरस्कार देण्यात आला होता. तसेच त्याला गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून अमेरिकेतील सर्वाधिक उंचीचा जिवंत व्यक्ती घोषित करण्यात आले होते. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून प्रमाणपत्र मिळाल्यावर इगोर अत्यंत आनंदी होता असे त्याच्या आईने सांगितले आहे. उंचीमुळे दैनंदिन कामे करणे देखील इगोरला अवघड ठरत होते. कारमध्ये बसणे आणि त्यातून बाहेर पडणे त्याच्यासाठी आव्हानात्मक होते.