स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेच्या सर्व चाचण्या पूर्ण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
‘आयएसी-विक्रांत’ या स्वदेशी बनावटीच्या विमानवाहू युद्धनौकेने अखेरच्या म्हणजेच चौथ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण करत संरक्षण क्षेत्रातील आपली ताकद सिद्ध केली. सर्व समुद्री चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करून रविवारी युद्धनौका कोची बंदरातील शिपयार्डमध्ये दाखल झाली. त्यानंतर भारतीय नौदलाने विक्रांतची छायाचित्रे जारी करत ही माहिती दिली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या युद्धनौकेवरील सर्व उपकरणे आणि यंत्रणांची चाचणी घेण्यात आल्याचे नौदलाकडून सांगण्यात आले. आता ‘आझादी का अमृत महोत्सव’चे औचित्य साधत 15 ऑगस्ट रोजी विक्रांत नौदलाच्या ताफ्यात सामील होईल. ‘आयएसी-विक्रांत’ (इंडिजेनस एअरक्राफ्ट कॅरिअर) नौदलात सामील झाल्यानंतर त्याला ‘आयएनएस विक्रांत’ (इंडियन नेव्हल शिप) अशी ओळख प्राप्त होणार आहे.
भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका ‘विक्रांत’ या महिन्याच्या अखेरीस भारतीय नौदलासाठी उपलब्ध होणार आहे. पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना विक्रांतचा नौदलातील कमिशनिंग सोहळा आयोजित केला जाणार आहे. त्यानंतर नौदलाच्या ताफ्यात सामील होऊन सागरी सीमेवर देशाचे संरक्षण करेल, असे भारतीय नौदलाने सांगितले. भारतीय नौदलाने चाचण्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली असून त्यात प्रथमच मिग-29-के लढाऊ विमाने, एएलएच आणि कामोव्ह हेलिकॉप्टर विक्रांतच्या डेकवर उभे असल्याचे दाखवण्यात आले आहे. या विमानवाहू युद्धनौकेमुळे समुद्रातील भारताच्या सामर्थ्यात मोठी वाढ होणार आहे. यासह भारत विमानवाहू युद्धनौका तयार करण्याची क्षमता असलेल्या जगातील मोजक्मया देशांच्या पंक्तीत सामील होणार असल्याचे भारतीय नौदलाचे सह-प्रमुख (उपप्रमुख), व्हाईस ऍडमिरल एस. एन. घोरमाडे यांनी सांगितले.
फुटबॉल मैदानाप्रमाणे विस्तीर्ण युद्धनौका
गेल्यावषी म्हणजे 2021 मध्ये विक्रांतची पहिली समुद्री चाचणी पूर्ण झाली होती. कोणत्याही विमानवाहू जहाजाची ताकद ही त्याची फ्लाईट-डेक म्हणजेच त्याची धावपट्टी असते. विक्रांतची धावपट्टी सुमारे 262 मीटर लांब आहे, म्हणजेच विक्रांत दोन फुटबॉल मैदानांपेक्षा मोठे आहे. विक्रांतची रुंदी सुमारे 62 मीटर आणि उंची 50 मीटर आहे. विक्रांतचा टॉप स्पीड 28 नॉट्स आहे आणि ती एकाचवेळी 7500 नॉटिकल मैल अंतर कापू शकते. त्यावर तैनात केलेली लढाऊ विमाने एक ते दोन हजार मैलांचे अंतरही पार करू शकतात.
विविध चाचण्यांमध्ये यशस्वी
नौदल रचना संचालनालयाने डिझाईन केलेले आयएनएस विक्रांत कोचीन शिपयार्ड लिमिटेड येथे बांधले गेले आहे. 37,500 टन वजनाच्या विक्रांतमुळे भारत आता अमेरिका, चीन, ब्रिटन आणि फ्रान्ससह काही निवडक देशांमध्ये सामील होणार आहे. अलीकडेच विक्रांतच्या तैनातीसाठी फ्रान्सच्या राफेल (सागरी) आणि अमेरिकेच्या एफ-18 हॉर्नेटच्या चाचण्याही गोव्यातील नौदल हवाई तळावर घेण्यात आल्या होत्या. दोन्ही लढाऊ विमानांच्या चाचणीचा अहवाल आल्यानंतर या दोनपैकी कोणते लढाऊ विमान विक्रांतवर तैनात करायचे, याचा निर्णय होणार आहे.