निफ्टी 159.80 अंकांनी घसरला : इंडसइंड बँक सर्वाधिक नुकसानीत
वृत्तसंस्था / मुंबई
युरोपियन बाजारातील व्यापक स्तरावर झालेल्या विक्रीच्या प्रभावामुळे चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी सेन्सेक्स 600 अंकांनी कोसळल्याचे पहावयास मिळाले आहे. बाजारात निर्देशांकामध्ये प्रभावी हिस्सेदारी ठेवणाऱया कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँक यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत.
दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 599.64 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 39,922.46 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 159.80 अंकांनी घसरुन निर्देशांक 11,729.60 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्समध्ये प्रामुख्याने इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. यासोबतच एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि टाटा स्टीलचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये भारती एअरटेलचे समभाग चार टक्क्यांनी मजबूत होत बंद झाले.
देशातील दुसऱया नंबरची दूरसंचार कंपनी भारती एअरटेलला जुलै-सप्टेंबर तिमाहीत आतापर्यंतची सर्वाधिक निव्वळ उत्पन्न प्राप्ती झाली आहे. यामध्ये कंपनीला आपला तोटा कमी करण्यास मदत मिळाली आहे. कंपनीचे एकत्रित उत्पन्न 2020-21 मध्ये 22 टक्क्यांनी वधारुन 25,785 कोटी रुपयांवर राहिले आहे. या घडामोडींचा लाभ गुंतवणूकदार घेणार असल्याचे संकेत अभ्यासकांनी यावेळी व्यक्त केले आहेत.
डेरिवेटिव्ह खंडामध्ये मासिक सौदे होण्यासह अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या वातावरणामुळे शेअर बाजारामध्ये मोठय़ा प्रमाणात चढ-उतार राहिला होता. युरोपियन बाजारात प्रारंभीच्या वेळी 3 टक्क्यांची घसरण राहिली होती. आशियातील अन्य बाजारांमध्ये हाँगकाँग आणि टोकीओ हे मात्र नुकसानीत राहिले आहेत.