सेन्सेक्सची 550 अंकांची पडझड ः जागतिक संकेताचे परिणाम
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात मंगळवारी बीएसई सेन्सेक्स नुकसानीसह बंद झाला आहे. यामध्ये विविध क्षेत्रांपैकी रियल्टी, वाहन आणि धातू क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत. बाजारात मंगळवारी जागतिक बाजारांमधील विक्रीच्या दबावामुळे भारतीय बाजारात नुकसानीचे सत्र राहिले असल्याचे पहावयास मिळाले आहे.
बीएसई सेक्सेन्स दिवसअखेर 554.05 अंकांनी घसरुन 0.90 टक्क्यांसोबत निर्देशांक 60,754.86 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 195.05 अंकांनी प्रभावीत होत 18,113.05 वर बंद झाला आहे.
दिवसअखेर प्रमुख कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील मारुती सुझुकीचे समभाग चार टक्क्यांच्या नुकसानीत राहिले होते. यासोबत टेक महिंद्रा, एचसीएल टेक, टाटा स्टील, इंडसइंड बँक आणि लार्सन ऍण्ड टुब्रोचे समभागही नुकसानीसह बंद झाले आहेत.
आशियातील बाजारांमध्ये हाँगकाँग, टोकीओ आणि सियोल नुकसानीत राहिले होते. यासह शांघाय सकारात्मक स्तरावर बंद झाला. युरोपीयन देशांमध्ये बाजारात दुपारपर्यंत ट्रेडिंगच्या दरम्यान झालेल्या विक्रीमुळे दबावाचे वातावरण राहिल्याचा परिणाम भारतीय बाजारात दिसून आल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 1.13 टक्क्यांनी वधारुन 87.46 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले आहे. यासोबतच विदेशी संस्थांकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीमध्ये सोमवारी 855.47 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री झाल्याची नेंद करण्यात आली आहे.
प्रमुख क्षेत्रांची स्थिती
मंगळवारच्या सत्रामध्ये प्रामुख्याने विविध क्षेत्रांपैकी दूरसंचार, वाहन, रियल्टी आणि धातू क्षेत्रांचे निर्देशांक 2.76 टक्क्यांनी घसरणीत राहिल्याची नेंद करण्यात आली आहे. दुसऱया बाजूला ऍक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, डॉ.रेड्डीज लॅब, टायटन आणि नेस्ले इंडियाचे समभाग फायद्यात राहिले आहेत.