क्रिडा प्रतिनिधी /बेळगाव
श्री स्पोर्ट्स खडकगल्ली आयोजित श्री चषक निमंत्रितांच्या ऑल इंडिया टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत रविवारी खेळविण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात झियान स्पोर्ट्स रायगड संघाने इंडियन बॉईज हिंडलगाचा 7 गडय़ांनी, विघ्नहर्ता स्पोर्ट्स अनगोळने साईराजचा 6 गडय़ांनी, जी. जी. बॉईज गोवाने एस. आर. एस. हिंदुस्थानचा 1 धावेने तर सरकार स्पोर्ट्स गांधीनगरने मोहन मोरे संघाचा 24 धावानी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. सुहास पवार, गोपाल भट्टा, गोपाल गवस, भूषण गोले यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात इंडियन बॉईज हिंडलगाने 8 षटकात 5 बाद 52 धावा केल्या. शिवाजीने 17 तर हर्षने 12 धावा केल्या. झियानतर्फे सुहासने 2 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना झियन स्पोर्ट्स रायकड संघाने 5.2 षटकात 3 बाद 55 धावा करून सामना 7 गडय़ांनी जिंकला. प्रथमेशने 18, मनोज संकपाळने 16 धावा केल्या. दुसऱया सामन्यात साईराजने 8 षटकात 3 बाद 70 धावा केल्या. मनोजने 19, रब्बानीने 16 धावा केल्या. विघ्नहर्तातर्फे गौरेश, प्रथमेश, सागेकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्याला उत्तर देताना विघ्नहर्ता संघाने 7.4 षटकात 4 बाद 73 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. गोपाल भट्टाने 39 तर दाजी नाईकने 17 धावा केल्या. साईराजतर्फे किरण तारिहाळकर, रब्बानी दफेदार, अनिल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
तिसऱया सामन्यात जीजी बॉईज गोवा संघाने 7.5 षटकात सर्व बाद 61 धावा केल्या. सुर्या गावकरने 28 धावा केल्या. एसआरएसतर्फे विजय, राजेश व आसीफ यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना एसआरएस हिंदुस्थानने 8 षटकात 9 बाद 60 धावाच केल्याने त्यांना केवळ 1 धावेने पराभव पत्करावा लागला. आरिफ शेखने 15, संदेशने 14, इजाज कुरेशीने 10 धावा केल्या. जीजी बॉईजतर्फे गोपाल गवसने 12 धावात 4 तर साहिलने 3 गडी बाद केले. चौथ्या सामन्यात सरकार स्पोर्ट्स गांधीनगरने 8 षटकात 4 बाद 89 धावा केल्या. भूषण गोलेने 40 तर गौस शेखने 39 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे गणेशने 2 तर प्रितम व प्रज्योत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्याला उत्तर देताना मोहन मोरे संघाने 8 षटकात 9 बाद 65 धावाच केल्या. रजतने 16, अनिकेतने 15, इस्तियासने 14 धावा केल्या. सरकारतर्फे किरण खोबरेकरने 4 तर अमोलने 2 गडी बाद केले.
सोमवारी पहिला उपांत्य सामना झेन स्पोर्ट्स वि. सरकार स्पोर्ट्स गांधीनगर सकाळी 10.30, विघ्नहर्ता वि. जेजी बॉईज दुपारी 12 वा.