भरदिवसा खिडकीचे गज कापून तिजोरीतील रोकड लांबविली
प्रतिनिधी / बेळगाव
रक्षक कॉलनी, विजयनगर येथे भरदिवसा चोरीचा प्रकार घडला आहे. खिडकीचे गज कापून चोरटय़ांनी तिजोरीतील 10 लाख रोकड लांबविली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. कॅम्प पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
गुंडू पिराजी चौगुले (वय 61) यांनी फिर्याद दिली आहे. गुंडू यांनी आपल्या जावयाच्या घरी ही रक्कम ठेवली होती. घरात कोणी नसताना खिडकीचे गज कापून चोरटय़ांनी रोकड पळविली आहे. घटनेची माहिती समजताच गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपायुक्त चंद्रशेखर निलगार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा, कॅम्पचे पोलीस निरीक्षक संतोषकुमार आदी अधिकाऱयांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. गुंडू यांचा जावई तलाठी आहे. भूखंड खरेदीसाठी गुंडू यांनी 10 लाख रुपये जावयाच्या घरी ठेवले होते. आपल्या नात्यातील एका मुलाच्या वाढदिवसासाठी ते खादरवाडीला गेले होते. जावई कामावर गेले होते.
बुधवारी दुपारी 2 वाजता घरातील मंडळी परतली. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला. खिडकीचे गज कापून चोरटय़ांनी घरात प्रवेश केला आहे. त्यानंतर तिजोरी उघडून तिजोरीत ठेवलेले 10 लाख रुपये लांबविले आहेत. वाढत्या चोऱया व घरफोडय़ांमुळे शहरात खळबळ माजली आहे. कॅम्प पोलीस पुढील तपास करीत आहेत.