केरळ अन् तामिळनाडूत निवडणूक
वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम
केरळमध्ये होणाऱया विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी धर्मधाम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. या मतदारसंघात 6 एप्रिल रोजी येथे मतदान होणार आहे. तर तामिळनाडूतील कोइम्बतूर दक्षिण मतदारसंघात मक्कल निधी मय्यम या पक्षाचे प्रमुख आणि अभिनेते कमल हासन यांनीही सोमवारी अर्ज दाखल केला आहे.
तोंडावर मास्क, हातात ग्लोव्ह्ज घातलेल्या विजयन यांनी अर्ज भरताना कोविड विषयक नियमांचे पालन केले आहे. माकपच्या कन्नूरचे जिल्हा सचिव एम.व्ही. जयरंजन यांच्यासह पक्षाचे अनेक नेतेही यावेळी उपस्थित होते. विजयन हे दुसऱयांदा धर्मधाम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. राज्यात वितरणासाठी लसीचे किती डोस उपलब्ध होतील हे माहित नाही, पण राज्य सरकार लस मोफत प्रदान करणार असल्याचे विजयन यांनी यावेळी म्हटले आहे. काँग्रेस आणि भाजपने विजयन यांच्या घोषणेच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे.
मक्कल निधी मय्यम या पक्षाच्या स्थापनेच्या 3 वर्षांनी 66 वर्षीय हासन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 2019 ची लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. विधानसभा निवडणुकीकरता मक्कल निधी मय्यमने अभिनेता आर. सरथ कुमारच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय समथुवा मक्कल काची आणि लोकसभा खासदार पारिवेंद्र यांच्या इंडिया जननायका काची या पक्षांसोबत आघाडी केली आहे. एमएनएम 234 जागांपैकी 154 ठिकाणी निवडणूक लढविणार आहे. उर्वरित जागा घटक पक्षांना देण्यात आल्या आहेत.