दुबई
इंग्लंडविरुद्ध मागील लढतीत पराभवाचा दणका बसलेला ऑस्ट्रेलियाचा संघ आज बांगलादेशविरुद्ध आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-12 फेरी लढतीसाठी मैदानात उतरेल, त्यावेळी विजयाच्या ट्रकवर परतण्याचे त्यांच्यासमोर मुख्य लक्ष्य असेल. सलग 4 लढतीत पराभव पत्करणारा बांगलादेशचा संघ यापूर्वीच स्पर्धेतून बाहेर फेकला गेला असल्याने त्यांच्यासाठी मात्र ही औपचारिक लढत असणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, आजची लढत दुपारी 3.30 वाजता खेळवली जाईल.
ऑस्ट्रेलियाच्या खात्यावर सध्या 3 सामन्यात 2 विजय नोंद असून उपांत्य फेरीत पोहोचण्याची आशा त्यांच्यासाठी कायम आहे. मागील लढतीत मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लंडविरुद्ध पत्करावा लागलेला पराभव मात्र त्यांच्या जिव्हारी लागणारा ठरला.
ऑस्ट्रेलियन सलामीवीर फिंचने इंग्लंडविरुद्ध देखील उत्तम सातत्य राखले. मात्र, त्यांच्या आघाडी फळीला अपेक्षित यश मिळाले नाही. येथे बांगलादेशविरुद्ध फिंच व वॉर्नर फ्लाईंग स्टार्ट देण्यासाठी प्रयत्नशील असतील.
यंदा आयपीएलचा उत्तरार्ध गाजवणाऱया ग्लेन मॅक्सवेलला येथे अद्याप पूर्ण सूर सापडलेला नाही. त्यामुळे, त्याच्याकडून तसेच मार्कस स्टोईनिस, मॅथ्यू वेडकडून शेवटच्या 5 षटकात जोरदार फटकेबाजीची ऑस्ट्रेलियाला अपेक्षा असेल.
यापूर्वी जोस बटलरने ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाजी ताफ्यातील पॅट कमिन्स, जोश हॅझलवूड, मिशेल स्टार्कचा चांगलाच समाचार घेतला होता. येथे मात्र बांगलादेशविरुद्ध जोरदार कमबॅक करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. ऑस्ट्रेलियाला या वर्षाच्या प्रारंभी बांगलादेशविरुद्ध टी-20 मालिका गमवावी लागली होती. तो हिशेब चुकता करण्याचाही ऑस्ट्रेलियाचा येथे प्रयत्न असेल.
बांगलादेशसमोर अनेक आव्हाने
सुपर-12 फेरीत लागोपाठ 4 पराभव पत्करणाऱया बांगलादेशसमोर ऑस्ट्रेलियासारखा तगडा प्रतिस्पर्धी समोर असताना आणखी कठीण आव्हान असेल, हे स्पष्ट आहे. या स्पर्धेत त्यांची फलंदाजी अगदीच निराशाजनक झाली असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 84 धावात डाव खुर्दा झाला, त्यावेळी त्यांच्या मर्यादा प्रकर्षाने चव्हाटय़ावर आल्या. या संघाला दुखापतग्रस्त शकीब हसनच्या गैरहजेरीचा देखील बराच फटका बसत आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लढतीत सलामीवीर लिटॉन दास व तळाच्या क्रमवारीत मेहदी हसन यांनीच फलंदाजीत थोडाफार प्रतिकार केला होता.
आज ते ऑस्ट्रेलियाला झुंजवण्यात यशस्वी होणार का, हे प्रत्यक्ष लढतीत स्पष्ट होईल.
संभाव्य संघ
@ऑस्ट्रेलिया ः ऍरॉन फिंच (कर्णधार), पॅट कमिन्स, ऍस्टॉन ऍगर, जोश हॅझलवूड, जोश इंग्लिस, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मार्कस स्टोईनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, ऍडम झाम्पा, मिशेल स्वेप्सन.
@बांगलादेश ः महमुदुल्लाह (कर्णधार), शकीब अल हसन, मुश्फिकूर रहीम, सौम्या सरकार, लिटॉन दास, अरिफ होसेन, मोहम्मद नईम, नुरुल हसन, शमिम होसेन, मुस्तफिजूर रहमान, तस्किन अहमद, मोहम्मद सैफुद्दिन, शोरिफुल इस्लाम, मेहदी हसन, नसूम अहमद. सामन्याची वेळ ः दुपारी 3.30 वा