क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
सातव्या हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत शनिवारी वास्कोतील टिळक मैदानावर ईस्ट बंगालची नॉथईस्ट एफसीविरूद्ध लढत होत आहे. सलग दोन पराभव झाले असल्यामुळे पहिला विजय नोंदवून संघाच्या पुनरागमनाची मोहिम उघडण्याचा ईस्ट बंगालचे प्रशिक्षक रॉबी फॉऊलर यांच निर्धार आहे.
ईस्ट बंगालला एटीके मोहन बागान आणि मुंबई सिटी एफसी यांच्याविरूद्ध पराभूत व्हावे लागले. फाऊलर यांच्या संघाला अद्याप एकही गोल करता आला नसून त्यांच्याविरूद्ध पाच गोल झाले आहेत. ‘वैयक्तिक चुकांमुळे संघ गुणांना मुकला. प्रामाणिकपणे सांगायचे तर, मैदानावरील सर्व क्षेत्रांत भक्कम पर्याय असणे मला आवडेल, पण मी तक्रार करू शकत नाही‘ असे लिव्हरपूलचे माजी स्ट्रायकर फाऊलर म्हणाले.
दुसरीकडे नॉर्थईस्टची मोसमात केलेली सकारात्मक सुरूवात कायम राखण्याचा उद्देश असेल, असे जेरार्ड न्यूस म्हणाले. आम्हाला चुरशीने खेळायचे आहे. आमची वाटचाल चांगल्या दिशेने सुरू आहे. आम्हाला बरीच सुधारणा करावी लागेल. यंदाच्या मोसमात चुरशीने खेळण्याचे ध्यैय आहे. आम्हाला एकाच वेळी एका सामन्याचा विचार करावा लागेल, असे न्यूस म्हणाले. नॉर्थईस्टच्या दृष्टीने अनेक गोष्टी अनुकूल घडत असल्या तरी खुल्या खेळातून गोल करणे ही एक समस्या ठरली आहे. त्यांचे चार पैकी तीन गोल सेट-पीसवर झालेले आहेत.
खुल्या खेळातून तसेच सेड-पिसेसवर संधी मिळविण्याच्यादृष्टीने आम्ही सराव करीत आहोत. आमच्याकडे एकाच प्रकारची योजना असणार नाही. ईस्ट बंगालच्या खेळाच आम्ही निरीक्षण केले आहे. त्यांना अपेक्षित निकाल साध्य करता आलेले नाहीत, पण ते आमच्यासाठी खडतर आणि धोकादायक प्रतिस्पर्धी ठरतील, असे न्यूस म्हणाले.
चेंडू ताब्यात असल्यावर ते किती चांगला खेळ करतात याची कल्पना आम्हाला आहे. सेट-पिसेसच्यावेळी त्यांचा खेळ चांगला संघटित असतो. आम्ही त्यांना रोखू आणि त्यांच्याविरूद्ध गोल करण्याच्या संधी निर्माण करू, असे न्यूस म्हणाले. आमचे सहा परदेशी खेळाडू आणि तेवढेच भारतीय खेळाडू नवे आहेत. या मोसमाचा कालावधी कमी आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही नियोजन केले आहे. वेगवेगळय़ा कल्पनांचा अवलंब करण्यास आम्ही सुरूवात केली आहे, असेही न्यूस म्हणाले. दोन्ही संघांनी आधीच्या लढतींत चेंडूवर जास्त ताबा ठेवू दिला असून प्रतिआक्रमणाला पसंती दिली आहे, अशावेळी शनिवारची लढत रंगतदार ठरु शकते.