फ्रान्सविरुद्ध आज, यजमान द. आफ्रिकेविरुद्ध उद्या लढत
वृत्तसंस्था/ पोश्चेफस्ट्रूम, द.आफ्रिका
भारताने एफआयएच प्रो हॉकी लीगमधील येथील मोहिमेची सुरुवात फ्रान्स व द.आफ्रिकाविरुद्ध लागोपाठ दोन विजय मिळवित केली होती. आता त्याचा समारोपही विजयाने करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.
या मोहिमेतील पहिल्या सामन्यात भारताने फ्रान्सचा 5-0 असा पराभव केला, त्यात हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, शमशेर सिंग, मनदीप सिंग व आकाशदीप सिंग यांनी गोल नोंदवले होते. आकाशदीपचा तो 200 वा आंतरराष्ट्रीय सामना होता. ‘फ्रान्स संघ हा अनप्रेडिक्टेबल असून त्यांना लय सापडल्यास ते कोणत्याही संघाला चकित करू शकतात. त्यामुळे शनिवारी होणाऱया सामन्यात त्यांना कमी लेखून चालणार नाही. यापूर्वी फ्रान्सची क्षमता नेदरलँड्सविरुद्ध दिसून आली आहे. नियमित वेळेत 2-2 अशी बरोबरी झाल्यानंतर पेनल्टी शूटआऊट घेण्यात आले आणि त्यात त्यांचा पराभव झाला होता. आमच्याविरुद्ध खेळतानाही त्यांनी गोल करण्याच्या उत्तम संधी निर्माण केल्या होत्या,’ असे कर्णधार मनप्रीत सिंग म्हणाला.
दुसऱया सामन्यात भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा 10-2 असा एकतर्फी धुव्वा उडविला. नवोदित जुगराज सिंगने हॅट्ट्रिक, गुरसाहिबजित सिंग व दिलप्रीत सिंग यांनी प्रत्येकी 2, हरमनप्रीत सिंग, अभिषेक, मनदीप सिंग यांनी एकेक गोल केले. मोठय़ा फरकाने विजय मिळविला असला तरी उत्तरार्धातील खेळात अजून सुधारित प्रदर्शन व्हायला हवे होते, असे मत मनप्रीतने व्यक्त केले. ‘जुगराज व अभिषेक या नवोदितांनी नोंदवलेले गोल हे या सामन्याचे वैशिष्टय़ होते, यात संशय नाही. पण जेव्हा आम्ही या सामन्याचा व्हिडिओ पाहिला तेव्हा लक्षात आले की उत्तरार्धात आमच्याकडून याहून सरस प्रदर्शन व्हायला हवे होते. बचावफळीत काही उणिवा राहिल्याने दक्षिण आफ्रिकेला कमबॅक करण्याची संधी मिळाली. त्याचवेळी आमचा खेळही मंदावला होता,’ असे तो म्हणाला.
सामन्याच्या चारही सत्रातील खेळात सातत्य राखण्याची गरज असून त्यावरच आम्ही आगामी दोन सामन्यांत लक्ष केंद्रित करणार आहोत. या दौऱयाची विजयाने सांगता करता व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न असतील, असेही तो म्हणाला. शनिवारी 12 रोजी भारत व फ्रान्स यांच्यात तर रविवारी 13 रोजी यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना होणार आहे.