वृत्तसंस्था/ मेलबोर्न
रविवारी येथे झालेल्या पाचव्या आणि शेवटच्या टी-20 सामन्यात लंकेने यजमान ऑस्ट्रेलियाचा पाच गडय़ांनी पराभव करत पाच सामन्यांच्या या मालिकेतील आपला संभाव्य व्हाईटवॉश टाळला. ऑस्ट्रेलियाने ही मालिका 4-1 अशा फरकाने जिंकली.
या शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 154 धावा जमविल्या. त्यानंतर लंकेने 5 बाद 155 धावा जमवित हा सामना जिंकला.
ऑस्ट्रेलियाच्या डावात मॅथ्यू वेडने नाबाद 43 तर मॅक्सवेलने 29 धावा जमविल्या. इंग्लिशने 23 तर डॅनियल सॅम्सने 18 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने डावातील शेवटच्या दोन षटकात 17 धावा जमविल्याने त्यांना 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. लंकेच्या कुमारा आणि चमिरा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना लंकेच्या डावात कुशल मेंडिसने नाबाद 69 तर शनाकाने 35 धावांचे योगदान दिले. सातव्या षटकाअखेर लंकेची स्थिती 3 बाद 54 अशी होती. मेंडिस आणि लियानगे यांनी चौथ्या गडय़ासाठी 17 धावांची भागीदारी केली असताना लियानगे डावातील 9 व्या षटकात धावचित झाला. 9 षटकाअखेर लंकेने 4 बाद 71 धावा जमविल्या होत्या. उर्वरित 11 षटकामध्ये त्यांना विजयासाठी 84 धावांची जरुरी होती. मेंडीस आणि शनाका यांनी महत्त्वपूर्ण भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियातर्फे केन रिचर्डसनने 28 धावात 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया ः 20 षटकात 6 बाद 154 (मॅथ्यू वेड नाबाद 43, मॅक्सवेल 29, इंग्लिश 23, कुमारा 2-34, चमिरा दोन बळी), लंका 5 बाद 155 (कुशल मेंडीस नाबाद 69, शनाका 35, केन रिचर्डसन 2-28).