के. आर. शेट्टी चषक क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
के. आर. शेट्टी स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित 13 वर्षाखालील के. आर. शेट्टी चषक आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत विजया अकादमीने रॉजर क्लबचा 32 धावांनी तर एसकेईने नीना स्पोर्ट्सचा 4 गडय़ांनी पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळविले. साईराज साळुंखे (विजया), हर्ष नाशिपुडी (एसकेई) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
गुड शेफर्ड मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात विजया क्रिकेट अकादमेने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 1 बाद 165 धावा केल्या. साईराज साळुंखेने 78, सिद्धार्थ रायकरने 46 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉजर संघाला 25 षटकात 7 बाद 133 धावा करता आल्या. त्यात ऋतुराज जाधवने 52, जतिन दुर्गाईने 18 धावा केल्या.
दुसऱया सामन्यात नीना स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 7 बाद 142 धावा केल्या. मदन चडीचळने 58, श्रेयश बोकलेने 24 धावा केल्या. एसकेईतर्फे दर्शनने 23 धावात 3 तर प्रथमेशने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसकेई सोसायटीने 22.5 षटकात 6 बाद 143 धावा करून सामना 4 गडय़ांनी जिंकला. त्यात हर्ष नाशिपुडीने 61, अथर्वने 23 धावा केल्या. नीनातर्फे परशुरामने 3, सर्वज्ञने 1 गडी बाद केला.