प्रतिनिधी / बेळगाव
कोविडच्या संकटकाळात हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामींनी बेळगावला रुग्णांच्या सेवेसाठी दोन रुग्णवाहिका दिल्या आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून स्वामींनी 50 विद्यार्थी आपल्या संस्थेकडे पाठवावेत, त्यांना इमर्जन्सी मॅनेजमेंट कोर्स पूर्णतः विनाशुल्क शिकविला जाईल, असे हमीपत्र विजया ऑर्थोचे डॉ. रवी पाटील यांनी स्वामींना दिले आहे.
श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी यांच्या पुढाकाराने उत्तर कर्नाटकात अनेक गरजूंना मदत मिळत आहे. गेल्यावर्षीच्या महापुरावेळी स्वामींच्या पुढाकाराने अन्नदान व गरजूंना मदत करण्यात आली होती. यंदाच्या कोरोनाकाळात त्यांनी दोन रुग्णवाहिका दिल्या आहेत. रुग्णांना औषधांचे किटही देत आहेत.
ग्रामीण भागात रुग्णसंख्या वाढत असल्याने तेथे डॉक्टर पाठवा, अशी विनंतीही पालकमंत्री गोविंद कारजोळ यांना केली आहे. या सर्व कार्याबद्दल विजया ऑर्थो कृतज्ञ असून संस्थेच्यावतीने 50 विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम मोफत शिकविला जाईल, असे डॉ. रवी पाटील यांनी नमूद केले. डॉक्टरांच्यावतीने वीरेश हिरेमठ यांनी स्वामींचा सत्कार केला.