आरूष पुत्रणला मालिकावीर पुरस्कार
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
विजया क्रिकेट अकादमी आयोजित 10 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने विजया क्रिकेट अकादमी संघाचा 6 गडय़ांनी पराभव करून विजया चषक पटकाविला. आरूष पुत्रण याला मालिकावीर पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
सकाळी युनियन जिमखाना मैदानावर विजय क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 5 गडी बाद 120 धावा केल्या. त्यात अनिश तेंडुलकरन 4 चौकारासह 37, श्रेया पोटेने 3 चौकारासह 28 केल्या. बेळगाव स्पोर्ट्सतर्फे लक्ष खतआयातने 2, अथर्व करडी व प्रितम मनतुर्की यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्स क्लबने 24.1 षटकात 4 गडी बाद 121 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. आरूष पुत्रणने 3 चौकारासह 49, लक्षने 2 चौकारासह 24 धावा केल्या. विजया अकादमीतर्फे अनिश तेंडुलकर व अद्वैत पाटील यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे राजू लेंगडे, डॉ. प्रकाश पाटील, चंदर कुंदरनाड, ताहिर सराफ, प्रणय शेट्टी, परशराम पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या बेळगाव स्पोर्ट्स क्लब व उपविजेत्या विजया क्रिकेट अकादमी संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील लक्षवेधी खेळाडू खेळाडू समर्थ चौगुले (नीना), समर्थ कोकणी (एसकेई), लक्ष (बीएससी), सुहास हिरेकुडी (जिमखाना), भक्ती मातले व कलश बेनकट्टी, श्रेया पोटे तर सावंतवाडीच्या संकेत जाधव यांना चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज अर्जुन येळ्ळूरकर व महंमद हमजा, उदयोन्मुख खेळाडू सुरज सकरी, प्रॉमिसिंग खेळाडू अद्वेत पाटील, अनिश तेंडुलकर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अब्बास किल्लेदार, अंतिम सामन्यातील सामनावीर लक्ष, मालिकावीर आरूष पुत्रण यांना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मिलिंद चव्हाण, सचिन साळुंके व अनिल गवी यानी काम पाहिले.