मुंबई / वृत्तसंस्था
इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत यजमान मुंबई सिटी एफसीचा संघ आपली अपराजित मालिका कायम राखण्यासाठी निर्धाराने मैदानात उतरेल. पण, तरीही येथे एटीके एफसीविरुद्ध लढताना त्यांना अधिक तगडय़ा आव्हानाला सामोरे जावे लागू शकते.
मागील रविवारी मुंबई फुटबॉल एरेनावर झालेल्या लढतीत मुंबईने हैदराबाद एफसीविरुद्ध 2-1 अशा फरकाने विजय संपादन केला होता. जॉर्ज कोस्टाचे मार्गदर्शन लाभत असलेला हा संघ मागील 6 सामन्यांपासून अपराजित आहे. यजमान मुंबई एफसीचा संघ गुणतालिकेत सध्या चौथ्या स्थानी आहे तर या लढतीतील प्रतिस्पर्धी एटीकेचा संघ 18 गुणांसह दुसऱया स्थानी विराजमान आहे. आजच्या लढतीतील विजयी संघाला 3 गुण प्राप्त होतील. मुंबईची भिस्त प्रामुख्याने सौगोयूवर असणार आहे.