वार्ताहर/ कराड
बांग्लामुक्ती संग्रामात भारतीय सैन्यदलाने मिळवलेल्या देदीप्यमान विजयाप्रीत्यर्थ कराडला प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणारा विजय दिवस समारोह यावर्षी कोरोना संकटामुळे रद्द करण्यात आला आहे. मात्र तरीही राज्यात असलेला रक्ताचा तुटवडा पाहता विजय दिवस समारोह समितीच्या वतीने 15 रोजी रक्तदान व 16 रोजी अभिवादन या दोन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
विजय दिवस समारोह समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. यावेळी प्रा. बी. एस. खोत, विनायक विभूते, तळबीडचे सरपंच जयवंतराव मोहिते, रमेश पवार, समितीचे सहसचिव विलासराव जाधव, प्राचार्य सतीश घाटगे, बी. जे. जाधव आदी उपस्थित होते.
निवृत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या संकल्पनेतून गत 22 वर्षांपासून कराडला 14 ते 16 डिसेंबरदरम्यान विजय दिवस समारोह साजरा करण्यात येत आहे. यावर्षी मात्र कोरोनाचे संकट असल्याने विजय दिवस समारोह रद्द करण्यात आला आहे. मात्र जवानांच्या सन्मानार्थ आणि राज्यातील रक्ताचा तुटवडा विचारात घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विजय दिवस समारोह समितीच्या वतीने मंगळवार 15 रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली. रक्तदात्यांनी मोठय़ा प्रमाणात रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्यास हातभार लावावा व अधिक माहितीसाठी रमेश पवार (मो. 9049843131) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बुधवार 16 रोजी समोराहाच्या मुख्य दिवशी प्रतिवर्षीप्रमाणे शासकीय अधिकारी, समितीच्या पदाधिकाऱयांच्या वतीने प्रथम स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात येणार आहे. यानंतर विजय दिवस चौकातील विजय स्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतीसदनातील विमान व रणगाडय़ालाही पुष्पहार घालण्यात येणार आहे. यानंतर मान्यवरांच्या वतीने तळबीड येथील छत्रपती शिवरायांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. कार्यक्रमास खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती तळबीडचे सरपंच जयवंत मोहिते यांनी दिली. आभार भरत कदम यांनी मानले.