आज 51 व्या वाढदिनी होणार लोकार्पण, 51 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचा समावेश
प्रतिनिधी / मडगाव
गोव्यात कोविडमुळे अनेक जण मृत्युमुखी पडलेले असून ऑक्सिजनचा तुटवडा भासल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. भाजप सरकार लसीकरणाच्या नावाखाली सध्या राज्यात उत्सव साजरा करत असून गोव्याला आरोग्याच्या दृष्टय़ा बळकट बनविण्यासाठी गोवा सरकारने कोविड महामारीवर लक्ष केंद्रीत करून अर्थसंकल्पात तरतुदी करण्याची गरज गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. आपल्या 51 व्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येस सरदेसाई यांनी ऑक्सिजन पेढी सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. आज सोमवारी त्यांच्या वाढदिनी 51 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर असलेल्या या पेढीचे लोकार्पण होणार आहे.
यानिमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सरदेसाई म्हणाले की, राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्मयता वर्तविण्यात येत असून या लाटेला तोंड देण्यासाठी ही ऑक्सिजन बँक सुरू करण्यात येत आहे. यावेळी मडगाव पालिकेचे नगराध्यक्ष लिंडन पेरेरा, गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर, वुई फॉर फातोर्डाच्या उषा सरदेसाई, नगरसेविका पूजा नाईक व इतर उपस्थित होते.
गोव्यात कोरोनामुळे मृत्यू आलेल्यांची संख्या पाहिल्यास परिस्थिती सध्या हाताबाहेर गेलेली दिसून येत आहे. राज्यातील सरकार न्यायालयाच्या आदेशानुसार चालत असल्यामुळे सरकार राज्यात आहे की नाही असा प्रश्न गोमंतकीय पडत आहे. गोवा हा हरवून गेला असून गोव्याला परत मिळविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. गोव्यातील भाजप सरकारने गोवा पावणीवर काढला असून गोव्यात असलेल्या टीम भाजपची बदली करून ‘टीम गोवा’ला पुढे आणण्यासाठी सर्वांनी काम करणे आवश्यक आहे, असे सरदेसाई म्हणाले.
सरकारकडून भेदभाव
कोरोनाबाधितांच्या भल्यासाठी फातोर्डा मतदारसंघात कोविड निगा केंद्र सुरू करण्यासाठी सरकारकडे डॉक्टर व नर्स पुरविण्यासाठी मागणी करण्यात आली होती. परंतु या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत असून जे आमदार भाजपला पाठिंबा देत आहेत फक्त त्याच आमदारांना त्यांच्या मतदारसंघात कोविड निगा केंद्र उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येत आहे. सरकार या अशा परिस्थितीतही भेदभाव करत आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला.
फातोर्डा मतदारसंघात ऑक्सिजन बँक सुरू करताना नागरिकांना मोफत 51 कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले असून याचा फायदा फातोर्डातील गरीब नागरिकांना होणार आहे. हे कॉन्सन्ट्रेटर नागरिकांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. कोविड महामारीत कोरोनाबाधितांच्या भल्यासाठी काम करणारे नागरिक मतभेद न ठेवता, माणुसकीला केंद्रस्थानी ठेवून काम करत आहेत, असे सरदेसाई यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत कोरोना महामारीत लोकांच्या भल्यासाठी काम करणाऱया नागरिकांचा सत्कार करण्यात आला.