आज उपांत्यपूर्व फेरीचे सामने
वृत्तसंस्था/ जयपूर
विजय हजारे करडंक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी येथील सवाई मानसिंग स्टेडियमववर सौराष्ट्र आणि विदर्भ त्याचप्रमाणे सैनी स्टेडियमवर केरळ आणि सेनादल यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळविले जाणार आहेत. या दोन्ही सामन्यांना बुधवारी सकाळी 9 वाजता प्रारंभ होईल.
सवाई मानसिंग स्टेडियममध्ये बुधवारी होणाऱया उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सौराष्ट्र आणि विदर्भ हे दोन्ही संघ समान तुल्यबळ आहेत. फझलच्या नेतृत्वाखाली विदर्भचा संघ या सामन्यात आक्रमक फलंदाजी करण्यावर अधिक भर देईल. कर्णधार फझलला या स्पर्धेतील यापूर्वी झालेल्या शेवटच्या सामन्यात फलंदाजीचा सूर मिळाला नव्हता. सलामीचा फलंदाज तायडेच्या फलंदाजीवर विदर्भचे यश अवलंबून राहील. दरम्यान तायडे याला गणेश सतीश, यश राठोड, अक्षय वाडकर आणि अपूर्व वानखेडे यांची साथ मिळणे जरूरीचे आहे. विदर्भ संघाच्या गोलंदाजीची भिस्त प्रामुख्याने यश ठाकुर आणि दर्शन नलकांडे यांच्यावर राहील. या स्पर्धेत यश ठाकुरने आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 18 गडी बाद केले आहेत. आदित्य सरवटे आणि अक्षय वाकरे हे या संघातील अनुभवी फिरकी गोलंदाज आहेत. विदर्भ संघाने उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्रिपुराचा पराभव करत शेवटच्या आठ संघात स्थान मिळविले. सौराष्ट्र संघामध्ये कर्णधार उनादकट आणि वेगवान गोलंदाज चेतन साकरिया यांच्या कामगिरीवर या संघाचे यश अवलंबून राहील.
या स्पर्धेत सोमवारी होणाऱया केरळ आणि सेनादल यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात केरळचे पारडे निश्चितच जड वाटते. कर्णधार संजू सॅमसन आणि सचिन बेबी हे या संघातील महत्त्वाचे फलंदाज असून त्यांना सलामीचा फलंदाज मोहम्मद अझरूउद्दीन तसेच रोहन कुनुमल आणि विष्णु विनोद यांची साथ मिळणे जरूरीचे आहे. केरळ संघातील फिरकी गोलंदाज सक्सेना, जोसेफ तसेच बसिल थंपी आणि निधीश यांच्या भेदक माऱयासमोर सेनादलाच्या फलंदाजांची सत्वपरीक्षा ठरेल. सेनादलाच्या संघात लखन सिंग, रवी चौहान, मोहित अहलावत हे प्रमुख फलंदाज असून दिवेश पठाणीया हा अनुभवी गोलंदाज आहे. सध्या तरी केरळचा संघ सेनादल संघाच्या तुलनेत अधिक बलवान वाटतो पण सेनादलाचा संघ चमत्कार करू शकेल, असा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.