प्रतिनिधी/ पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या अहंकारपोटी गोमंतकीय जनतेला मोफत वीज देण्याचे नाकारलेले असताना त्यांच्याच पक्षातले त्यांचे मुंबई येथील सहकारी याच मुद्यावर निदर्शने करीत आहेत आणि त्यांच्याच पक्षाने तेलंगणा येथे हैदराबाद येथील रहिवाशी यांना मोफत वीज देण्याचे आश्वासन दिले आहे. अशी माहीती आम आदमी पक्षाचे सुरेल तिळवे यांनी पत्रकार परीषदेत दिली.
हैदराबाद येथे निवडणुका होत असून भाजपचा जाहीरनामा यानिमित्ताने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते प्रकाशित करण्यात आला आणि जाहीरनाम्यामध्ये मोफत वीज आणि पाणी पुरवठा रहिवासी व नागरिकांसाठी देण्यात आलेला आहे. विरोधाभास असा आहे कि भाजप मोफत विजेसाठी आग्रह आणि आश्वासने देऊन शेजारच्या महाराष्ट्र आणि हैदराबाद या राज्यांमध्ये रान पेटवत आहे आणि गोवा भाजपचे मुख्यमंत्री लोकांची मोफत वीज देण्याची मागणी स्वीकारायला नकार देत आहेत. असे तिळवे यांनी पुढे सांगितले.
वीज मंत्री निलेश काब्राल यांच्या वीज मुद्यावर आधारित लाईव्ह चर्चेमध्ये अतिशय गाफीलपणाच्या कामगिरीमुळे गोवा सरकारकडून ‘वन टाईम सेटलमेंट’ योजनेची घोषणा करण्यात आली. या योजनेच्या अंतर्गत लोकांना थकलेली बिले देताना पूर्णपणे रद्द करण्याची सूट किंवा उशिरा देण्यात आल्याबद्दल आकारल्या जाणाऱया अतिरिक्त शुल्क किंवा पेमेंट्समध्ये घट किंवा काटछाट करणे अशाप्रकारे सवलत किंवा सूट मिळणार आहे. असे तिळवे यावेळी म्हणाले.
वस्तुस्थिती अशी आहे आता भाजप काही राज्यांमध्ये मोफत वीज पुरवठा करण्यासाठी पुढे सरसावत आहे जे हेच सिद्ध करते कि वीज टेरिफ किंवा वीज दराचा अरविंद केजरीवाल मॉडेल हाच सर्वात चांगला असून यापूर्वी वेगवेगळय़ा राजकीय पक्षांकडून जो मॉडेल वापरण्यात आला त्यांच्यापेक्षा कित्येक पटींनी चांगला आहे आणि हाच मॉडेल गोव्यातही अंमलात आणला जावा, यासाठी आम आदमी पक्षाचा लढा यापुढेही सुरूच राहणार आहे असेही तिळवे यांनी पुढे सांगितले.