वार्ताहर/ विजापूर
रक्कम-दागिने लुटल्याप्रकरणी दोन दिवसापूर्वी आलमेल पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, सिंदगी येथे त्या तिघांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. तसेच त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यानंतर त्यांना विजापूरच्या दर्गा जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, शनिवारी त्या तिघांपैकी दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यानुसार विजापूर जिल्हय़ात दिवसभरात 9 जण कोरोनाबाधित झाले आहेत. एकूण यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कोरोनाबाधित त्या संशयितांना उपचारासाठी येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच त्या संशयितांची चौकशी केलेले दोन पीएसआय आणि 37 हवालदारांचे शनिवारी स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्याचबरोबर सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत. विजापूर जिल्हय़ात एकूण रुग्णसंख्या 247 वर पोहोचली आहे. त्यापैकी 211 जण कोरोनामुक्त झाले असून 7 जणांचा बळी गेला आहे. तर 29 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.