सिंदगी, बबलेश्वर तालुक्यात कारवाई : पिता-पित्रासह तिघांना अटक
वार्ताहर/ विजापूर
जिल्हय़ात विविध ठिकाणी छापा टाकून 176 किलो गांजाची रोपे व तयार 3 किलो गांजा जप्त केला असून पिता-पुत्रासह तिघांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाई विजापूर पोलीस व अबकारी खात्याच्या अधिकाऱयांनी शनिवार दि. 12 रोजी सिंदगी तालुक्यातील बलगानूर व बबलेश्वर तालुक्यातील काकणकी येथे केली. मलसिद्धप्पा मदारी (वय 54), अरविंद मदारी (वय 25, दोघे रा. बलगानूर), महादेव संगप्पा निलगंजी (रा. शिरोळ, ता. मुधोळ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत 13 लाख रुपये असल्याचे समजते.
याबाबत समजलेली माहिती अशी, सिंदगी तालुक्यातील बलगानूर येथे मलसिद्धप्पा मदारी व त्याचा मुलगा अरविंद मदारी या दोघांनी आपल्या उसाच्या शेतात गांजाची रोपे लावली होती. याची माहिती मिळताच विजापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कांबळे यांच्या नेतृत्त्वाखाली पोलिसांनी धाड टाकून शेतातील 46 किलो गांजाची रोपे जप्त केली. तसेच या दोघांकडे तयार असलेला 3 किलो गांजाही जप्त केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर बबलेश्वर तालुक्यातील काकणकी येथे महादेव निलगंजी याने शेतात बेकायदेशीररित्या गांजाची रोपे लावली होती. याची माहिती अबकारी खात्याला मिळताच आयुक्त वाय. एस. मंजुनाथ, उपायुक्त अरुणकुमार, निरीक्षक महादेव पुजारी यांच्या नेतृत्त्वाखाली अधिकाऱयांनी धाड टाकून 130 किलो गांजाची रोपे जप्त करून महादेवला अटक केली आहे. या दोन्ही घटनांची नोंद बबलेश्वर व सिंदगी पोलिसात झाली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
कारवाईमुळे गांजा लागवड करणाऱयांचे धाबे दणाणले
राज्यभरात प्रशासनाकडून अमली पदार्थविरोधात तीव्र कारवाई करण्यात येत आहे. तसेच विविध ठिकाणी धाडी टाकून मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थ व गांजाची रोपे जप्त करण्यात येत आहेत. विजापूर जिल्हय़ात केलेल्या कारवाईमुळे अमली पदार्थांची तस्करी व रोपे लावणाऱयांचे धाबे दणाणले आहेत. आता यापुढेही अशाप्रकारची कारवाई तीव्र करण्याची गरज आहे..