भारतात प्रथमच व्यावसायिक लढतीचे आयोजन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचा स्टार मुष्टियोद्धा विजेंदर कुमारची पुढील लढत गोव्यात रंगणार आहे आणि यासाठी लढतीचे ठिकाण असणार आहे, कॅसिनो! पणजी-गोव्यातील मांडवी नदीच्या किनाऱयावर स्थित मॅजेस्टिक प्राईड कॅसिनो शिपच्या रुफटॉप डेकवर विजेंदर लढेल. एखाद्या कॅसिनो शिपवर प्रोफेशनल बॉक्ंिसग लढत रंगण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असणार आहे.
व्यावसायिक मुष्टियुद्धात पदार्पण केल्यानंतर विजेंदरची ही 13 वी लढत असून यापूर्वी सर्वच्या सर्व 12 लढती जिंकण्याचा भीमपराक्रम त्याने गाजवला आहे. विजेंदरचा प्रतिस्पर्धी कोण असेल, हे अद्याप निश्चित होणे बाकी आहे.
35 वर्षीय विजेंदर विद्यमान डब्ल्यूबीओ ओरिएन्टल, डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट चॅम्पियन असून नोव्हेंबर 2019 मध्ये त्याने दुबईत शेवटची लढत खेळली. त्यावेळी त्याने घानाचा माजी राष्ट्रकुल विजेता चार्ल्स ऍडम्यू याला जमीनदोस्त केले होते. ती लढत दुबईत झाली होती. त्यानंतर विजेंदरने एकही लढत खेळलेली नाही.
‘अद्याप अपराजित राहिलेला स्टार मुष्टियोद्धा दि. 19 मार्च रोजी रिंगवर पुनरागमन करेल. त्याच्या लढतीसाठी आम्ही मॅजेस्टिक प्राईड कॅसिनो शिपच्या डेकची निवड केली असून एखाद्या शिपवर अशी व्यावसायिक लढत रंगण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. मॅजेस्टिक प्राईड कॅसिनो हे व्हेन्यू पार्टनरही आहेत’, असे विजेंदरचे प्रमोटर्स आयओएस बॉक्सिंग प्रमोशन्सने एका पत्रकातून जाहीर केले. ‘विजेंदरची लढत सर्वसाधारण व्यावसायिक लढतीतील पारंपरिक निकषाच्या तुलनेत विभिन्न असेल आणि या लढतीतून चाहत्यांना बॉक्सिंग इव्हेंटमधील ग्लॅमर व झगमगाट दिसून येईल. विजेंदरचा प्रतिस्पर्धी कोण असेल, हे लवकरच जाहीर केले जाईल’, असेही आयोजकांनी याप्रसंगी नमूद केले. दस्तुरखुद्द विजेंदरने आपण या अनुभवासाठी उत्सुक असल्याचे सांगितले.