वडूज /प्रतिनिधी :
खटाव तालुक्यात रविवारी झालेल्या वादळी पावसाने जोरदार तडाखा देल्याने लाखो रुपयांची वित्तहानी केली. उंबर्डे येथे विजेचा धक्क्याने एक म्हैस ठार झाली.
माजी उपसरपंच हणमंत शामराव फडतरे यांच्या मालकीची ६० हजार रुपये किंमतीची ही म्हैस होती. गावकामगार तलाठी मराठे यांनी दुर्घटनेचा पंचनामा केला. तर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खाडे यांनी मृत म्हशीचे शवविच्छेदन केले.
वादळाने तडवळे शाळेचे पत्रे उडाले
दुसऱ्या घटनेत तडवळे येथे अचानक आलेले वादळी वारे, पाऊस यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तडवळे ता.खटाव येतील खोल्यांचे पत्रे उडून गेल्याने आतील साहित्य पावसामुळे पूर्ण भिजले आहे. यामध्ये संगणक स्पीकर संच तसेच शाळेतील तक्ते, बेंचेस व अन्य साहित्य तसेच समोरील पिंपरीचे झाड शाळेच्यासमोर पडल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
गावामध्ये अनेक घरांची पडझड झाली असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. दरम्यान, नायकाचीवाडी येथील सुतारवस्ती नजिक वडूज रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडल्याने काही काळ रस्ता बंद होता तर वाकेश्वर येथील सूर्यकांत मुगटराव फडतरे यांच्या गुरांच्या गोठ्याचे पत्रे व छप्पर उडून गेले.