प्रतिनिधी/ मडगाव
मार्लीम -बोर्डा येथील ओमकार अच्चूत रेडकर या 16 वर्षाच्या हुशार विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे मडगाव व आसपासच्या भागातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
विजेचा धक्का लागून शुक्रवारी रात्री या विद्यार्थ्याला मृत्यू आला होता. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार शेजारच्या घरात गेल्यानंतर ओमकार यांचा हात एका वायरला लागला आणि त्यामुळे विजेचा धक्का लागून मृत्यू आला. शवचिकित्सेनंतर या 16 वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह मयताच्या जवळच्या नातेवाईकांकडे सोपविण्यात आला. शनिवारी सायंकाळी त्यांच्यावर पाजीफोंड -मडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
सदर विद्यार्थी मडगावच्या महिला नुतन विद्यालयात 10 वीच्या वर्गात शिकत होता आणि दहावीत त्याने 87 टक्के गुण घेतले होते. एक हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकीक होता. आईवडिलांचा तो एकुलता एक मुलगा होता. फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले आहे. फातोर्डाचो पोलीस उपनिरीक्षक मेलीतो फर्नाडिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.