निपाणीतील चिमगावकर गल्लीमधील घटना
प्रतिनिधी/ निपाणी
विजेच्या धक्क्याने मंडप व्यावसायिकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास येथील चिमगावकर गल्लीमध्ये घडली. शांतीनाथ भिकाजी मेस्त्राr (वय 42, रा. थळोबा पेठ, निपाणी) असे मृताचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, चिमगावकर गल्ली येथे सुनील घाळी यांचा घरगुती कार्यक्रम होता. हा कार्यक्रम घराच्या टेरेसवर असल्याने तेथे मंडप उभारण्यात आला होता. सदर मंडप काढण्यासाठी शांतीनाथ हा सकाळी 11 च्या सुमारास गेला होता. टेरेसवरील मंडप काढत असताना त्याचा अचानक विद्युत तारेला स्पर्श झाला. त्यामुळे विजेचा धक्का बसून तो खाली कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनास्थळी शहर फौजदार अनिलकुमार कुंभार, साहाय्यक फौजदार एस. के. नरेगल, हवालदार एस. एस. चिकोडे यांनी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी शांतीनाथ यांच्या पत्नीने सुनील घाळी यांच्याविरोधात निपाणी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. उत्तरीय तपासणीनंतर शांतीनाथ यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.