-जिल्हा परिषदेसमोर केले आंदोलन -तात्काळ पदोन्नती करण्याची मागणी
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत कार्यरत बारावी विज्ञान शिक्षकांकडून `विषय शिक्षक’ पदोन्नतीसाठी वारंवार पाठपुरावा केला जात आहे. यामध्ये दोन वर्षांहून अधिक कालावधी झाला तरी प्रशासनाने ठोस कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे पदोन्नती व हक्कापासून वंचित प्राथमिक शिक्षकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. `विज्ञान विषय शिक्षक कृती समिती’च्या नेतृत्वाखाली हातामध्ये मागण्यांचे फलक घेऊन उपस्थित शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
मागण्यांचे निवेदन शिक्षण सभापती रसिका पाटील यांना दिले. यावेळी सीईओ चव्हाण यांच्यासोबत चर्चा करून पदोन्नतीचा विषय लवकरच मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही सभापती पाटील यांनी दिली. धरणे आंदोलनस्थळी प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विज्ञान विषय शिक्षकांच्या पदोन्नतीबाबत शिक्षण समिती सभेत ठराव झाला असून त्यानुसार येत्या ऑक्टोबर अखेरपर्यंत पदोन्नतीचा पहिला टप्पा पूर्ण केला जाईल, अशी ग्वाही दिली. पहिल्या टप्प्यात सुमारे साडेचारशे शिक्षकांच्या पदोन्नतीचा विषय मार्गी लागेल. त्यानंतर पुढील टप्प्यात उर्वरित विज्ञान शिक्षकांची पदोन्नती केली जाईल, असेही शिक्षणाधिकारी उबाळे यांनी सांगितले.
निवेदनामध्ये म्हटले आहे, सुमारे 80 टक्के उच्च प्राथमिक शाळेत विज्ञान विषय शिक्षक उपलब्ध नसताना पदोन्नती पात्र 1100 शिक्षकांना डावलले जात आहे. आपल्या न्याय, हक्कासाठी विज्ञान विषय शिक्षक कृती समिती पात्र व वंचित शिक्षकांना घेऊन सनदशीर मार्गाने शासन निर्णयानुसार विज्ञान विषय शिक्षक पदोन्नती करण्याची मागणी करत आहेत. या संदर्भातील कार्यवाही करताना विज्ञान पदोन्नतीचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करवा, विज्ञान शिक्षक एकूण रिक्त पदे शाळानिहाय यादी जाहीर करावी, पदोन्नती प्रक्रिया दोन टप्प्यात घ्यावी, यामध्ये पहिला टप्पा पदोन्नती नंतर ऐच्छिक पदावनती घेण्यात यावी. विषय शिक्षक समायोजनानंतर पदोन्नतीचा दुसरा टप्पा राबवावा, पहिल्या टप्प्यानंतर उर्वरित सर्व पदोन्नती पात्र शिक्षकांची संधी कायम ठेवावी. असे शक्य नसल्यास पहिल्या टप्प्यात पदोन्नतीसाठी सर्व रिक्त जागा उपलब्ध करव्यात. या मागण्यांनुसार तात्काळ पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण करावी. वंचित व अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा, आदी मागण्यांचा निवेदनामध्ये समावेश आहे.
आंदोलनामध्ये विज्ञान कृती समितीचे संजय रोगे, मंगेश धनवडे, प्रभाकर कमळकर, बालाजी पांढरे, विश्वनाथ बोराटे, संदीप माने, दीपक गायकवाड, निलेश कारंडे, सनी सुतार, सुनिल गुरव, दस्तगीर फकीर, प्रकाश भोसले (सावर्डे), संतोष भोसले यांच्यासह बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते. प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी बापट यांनी आंदोलनास पाठींबा दिला.