प्रतिनिधी / विटा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. परंतु तरीही शहरात मोकाट फिरणाऱ्यांची संख्या कमी नाही. आतामात्र हे मोकाट फिरणारे पोलिसांच्या रडारवर येणार आहेत. विटा शहरावर आता ड्रोन कॅमेऱ्याची नजर असणार आहे. नुकतेच त्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. विट्यात विनाकारण फिरणाऱ्यांचे आणि गर्दी करणाऱ्या नागरिकांचे छायाचित्रण सुरू झाले आहे.
कोरोना आजाराने जगभरात थैमान घातले आहे. सांगली जिह्यात 25 रुग्ण सापडल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. संचारबंदी आदेश लागू असतानाही अनेक ठिकाणी नागरिक अनावश्यक गर्दी करीत आहेत. गर्दी टाळण्याचे आवाहन पोलिस पोटतिडकीने करीत आहेत. तरीही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. सध्या समुह संसर्ग होण्याची शक्यता असून, नागरिकांनी गर्दी करु नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
परंतु मेडीकल औषधे, दूध, किराणामाल खरेदीचा बहाणा करुन अनेक नागरिक शहरात अनावश्यक फिरताना दिसत आहेत. अशांवर आता ड्रोन कॅमेऱ्याद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे. नुकतेच खानापूर रोड येथील हिरा ट्रॅव्हल्स ऑफीसजवळून शहरात ड्रोन कॅमेरा सोडण्यात आला. या ड्रोनने विटा शहर परिसराचे छायाचित्रण केले. ड्रोनद्वारे परिसराची पाहणी करुन गर्दी करणाऱ्यांवर पोलिस आता कठोर कारवाई करतील, असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी अंकुश इंगळे यांनी दिला. यावेळी पोलिस निरीक्षक रवींद्र शेळके, ड्रोन पथक प्रमुख पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी, पोलिस नाईक मोहिद्दिन मुजावर, पोलिस हवालदार सिद्धार्थ कांबळे, भूषण पवार, स्वप्नील जाधव यांच्यासह पोलिस उपस्थित होते.