प्रतिनिधी/विटा
कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे चारचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात विट्यातील राष्ट्रवादी काँगसचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य गजानन निकम यांचे सुपुत्र सुदर्शन निकम आणि तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील कपिल झांबरे आणि धनश्री झांबरे अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवार २४ डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झाला.
विट्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य गजानन निकम यांचे सुपुत्र सुदर्शन निकम आणि संग्राम संजय गायकवाड हे दोघे शुक्रवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास खेराडे येथून विट्याकडे येत होते. तर तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील कपिल माणिक झांबरे आणि त्यांच्या पत्नी आपल्या नातेवाईकांसह तासगावहून पुणे येथे निघाले होते. यावेळी कडेगाव तालुक्यातील नेवरी येथे दोन्ही वाहनांची सामोरासमोर धडक होवून भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला आहे.
अपघातात सुदर्शन गजानन निकम आणि तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी येथील कपिल झांबरे आणि त्यांच्या पत्नी धनश्री झांबरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रज्वल पुंडलिक झांबरे हे गंभीर जखमी झाले आहेत, तर संग्राम गायकवाड किरकोळ जखमी झाला आहे. झांबरे यांना उपचारासाठी सांगली येथे हलवण्यात आले आहे. अपघातानंतर परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.