विनामास्क कारवाई दरम्यानचा प्रकार : दोन तरुणांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी / विटा
येथील मायणी रस्त्यावर विनामास्क फिरणा-यांवर पोलिसांची कारवाई सुरू होती. या दरम्यान एका दुचाकी चालकाने त्याच्या मागील सहकाऱ्यासह पोलिसाला शंभर मीटर फरफटत नेल्याची तक्रार विटा पोलिसात दाखल झाली आहे. हा प्रकार शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला. यामध्ये पोलिस नाईक नंदकुमार भगवान मदने ( वय ४०) जखमी झाले. याप्रकरणी दुचाकी चालक शुभम राजू भागवत ( वय २३, विवेकानंद नगर, विटा ) व प्रतिक दुर्योधन बिसूरकर ( वय १९, विटा ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या अनुषंगाने विनामास्क दुचाकीवरून फिरणा-यांवर पोलिस नंदकुमार मदने आणि सहकारी पोलीस कर्मचारी विटा – मायणी रस्त्यावर कारवाई करत होते. या दरम्यान शिवाजी चौकाकडून मायणी रस्त्याकडे दुचाकीवरून(क्रमांक – ) दोन तरूण विनामास्क येताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना दुचाकी थांबविण्याचा इशारा केला. मात्र दुचाकी चालकाने पोलिस मदने यांच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केला. दुचाकी शुभम भागवत चालवत होता. तर त्याच्या पाठीमागे प्रतिक बिसूरकर बसला होता. बिसूरकर याने पोलीस मदने यांचा उजवा हात धरून त्यांना दुचाकी बरोबर सुमारे शंभर मीटर फरफटत नेले. पुढे वाहतूक कोंडी झाल्याने बिसूरकर याने मदने यांना सोडून दिले. तोपर्यंत मदने यांच्याबरोबर असणारे अन्य पोलिस कर्मचारी तेथे पोहोचले. त्यांनी पळून जाणा-या भागवत व बिसूरकर या दोघांना नागरीकांच्या मदतीने पकडून ताब्यात घेतले. मदने यांच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय विटा येथे उपचार करण्यात आले. भागवत व बिसूरकर यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल व पोलिस नाईक मदने यांना जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.