प्रतिनिधी / विटा
विट्यात दीड लाख रुपयांची लाच मगितल्या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकासह पोलिस कर्मचारी आणि खासगी इसम लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. सांगलीच्या लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे, पोलीस कर्मचारी विवेक यादव, खासगी इसम अकीब फिरोज तांबोळी यांच्यावर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिली.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिलेली माहिती अशी, काही दिवसांपूर्वी तक्रारदार यांच्या मालकावर विटा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी आणि वाढीव पोलीस कोठडी न मागण्याकरिता तक्रारदार यांच्याकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे आणि पोलीस कर्मचारी विवेक यादव यांनी दीड लाख रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर 25 मार्च रोजी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत याबाबतची तक्रार दाखल केली.