प्रतिनिधी /मडगाव
‘चंद्रभागेच्यातीरी, उभा मंदिरी, तो पहा विटेवरी दुमदुमली पंढरी, पांडुरंग हरि, तो पहा विटेवरी’…. या सारख्या भक्ती गीताने काल मठग्राम नगरी पुन्हा एकदा दुमदुमली. मडगावच्या श्री हरि मंदिर देवस्थानच्या 112वा दिंडी महोत्सव काल भक्ती भावाने व उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित केलेल्या देंडी स्पर्धा खऱया अर्थाने लक्ष वेधी ठरली.
कोविड-19 मुळे गेल्या वर्षी दिंडी महोत्सव साजरा करणे शक्य झाले नव्हते. यंदाही दिंडी महोत्सव मर्यादित स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला होता. मंदिरात सकाळी धार्मिक विधी व त्यानंतर भजनाचा कार्यक्रम झाला. भाविकांनी कोरोना महामारीचे सर्व नियम पाळून श्रींचे दर्शन घेतले. गायक कलाकारांच्या मैफली व पालखी मिरवणूक रद्द करण्यात आली तरी देवस्थान समितीने मंदिराच्या आवारात ग्रंथ मिरवणूक काढली. आज या दिंडी महोत्सवाची सांगता होणार आहे.
दिंडी स्पर्धेने भक्तीमय वातावरण
श्री दामबाबाले घोडे कल्चरल असोसिएशने आयोजित केलेल्या दिंडी स्पर्धेने खऱया अर्थाने मठग्राम नगरीत भक्तीमय वातावरण निर्माण केले. यंदा ही दिंडी स्पर्धा मडगाव पालिका ते स्टेट बँक ऑफ इंडिया या दरम्यान घेण्यात आली. तिला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. दिंडी स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी भाविकांनी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावली होती.
या दिंडी स्पर्धेत वाळपई, शिवोली, मडगाव तसेच इतर भागातून आलेली पथके सहभागी झाली होती. पारंपारिक वेशभूषा, टाळ, मृदूग तसेच पखवाज यांच्या तालावर दिंडी पथकातील कलाकारांनी दिंडीचा सुंदर आविष्कार सादर केला.
श्री दामबाबाले घोडे तर्फे आकाश कंदिल स्पर्धाही आयोजित केली होती. तिला ही उदंड असा प्रतिसाद लाभला.
सॉलीड पार्टीने आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेत गोव्यातील कलाकारांनी रांगोळीचा सुंदर नजारा पेश केला होता. दर वर्षी ही रांगोळी स्पर्धा सर्वाचे आकर्षण ठरते. यंदा ही उत्स्फूर्त असा प्रतिसाद रांगोळी स्पर्धेला लाभला. नेत्रसुखद रांगोळय़ांनी दिंडी महोत्सवात रंग भरला
पं. शौनक अभिषेकी मैफल रंगली
मडगाव रवींद्र भवनच्या वतीने पं. शौनक अभिषेकी यांच्या गायनाची मैफल आयोजित केली होती. या मैफलीत शौनक अभिषेकी यांनी काही भक्ती रचना सादर करून श्रोत्यांना संगीत मैफलीची मेजवानी दिली. त्यांची मैफल रात्री उशिरा पर्यंत सुरू होती. यंदा दिंडी महोत्सवातील गायनी बैठका देवस्थान समितीने रद्द केल्या तरी ही उणीव या मैफलीने भरून काढली. या मैफलीचा आनंद लुटण्यासाठी श्रोत्यांनी गर्दी केली होती.