प्रतिनिधी/ बेळगाव :
महामारी कोरोनामुळे राज्यातील विणकर कुटुंबियांची परिस्थिती दयनीय बनली आहे. या परिस्थितीवर आधारीत अहवाल तयार करण्यात यावा. तसेच विणकरांनी विणलेल्या साडय़ांची खरेदी करण्याबाबत आणि विणकर सन्मान योजने अंतर्गत विणकर कामगारांना दरवर्षी पाच हजार रुपये मदत देण्यात यावी, अशी मागणी उत्तर कर्नाटक विणकर विकास समितीच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी एस. बी. बोम्मणहळ्ळी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली आहे. यावेळी साडय़ा खरेदी करण्यासाठी कोणती उपाय योजना करावी याची सविस्तर माहितीही विणकर संघटनेच्या पदाधिकाऱयांनी जिल्हाधिकाऱयांना दिली.
बेळगाव शहरात एक केंद्र, बागलकोट जिल्हय़ात एक तसेच बेंगळूर ग्रामीण जिल्हय़ातील दोड्डबळ्ळापूर येथे साडी खरेदी केंदाची स्थापना करावी आणि त्या भागातील साडय़ांची खरेदी करावी. बेळगाव जिल्हय़ात पॉलिस्टर, सुती आणि सिंथेटीक साडय़ा विणल्या जातात तर बागलकोट जिल्हयात सुती आणि अन्य साडय़ा उत्पादन करण्यात येतात. तर दोड्डबळ्ळापूर येथे रेशीम, आर्टसिल्क आणि क्रेप ठाणा साडय़ा विणल्या जातात. या साडय़ांची खरेदी करावी, एका वर्षाच्या कालावधीसाठी आधारीत साडय़ांचा दर निश्चित करण्यात यावा. या साडय़ांची बाजारपेठ संपूर्ण देशभर असल्याने पहिल्या टप्प्यातील साडय़ांचा दर 250 ते 350 पर्यंत आहे. दुसऱया टप्प्यातील साडय़ांचा दर 350 ते 600 त्यानंतर 600 ते 1000 आणि चौथ्या टप्प्यातील साडी दर 1100 ते 1500 रुपये असून पाचव्या टप्प्यातील रेशीम, आर्टसिल्क आदी साडय़ांचा दर 1500 हून पुढे आहे. अशा प्रकारच्या साडय़ा आपल्या राज्यात उत्पादीत होत असून साडय़ांच्या गुणवत्तेनुसार त्यांची विक्री करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
राज्यातील स्त्री शक्ती संघाच्या महिला कार्यकर्त्या, बीपीएल- अंत्योदय रेशनकार्ड आणि महिला व बालकल्याण खाते, अंगणवाडी कार्यकर्त्या, मध्यान्ह आहार बनविणाऱया कार्यकर्त्या, कामगार खाते, झोपडपट्टी आणि भटके व विमुक्त जमाती मधील महिला, आरोग्य खात्यात काम करत असणाऱया महिला कर्मचाऱयांना या साडय़ा मोफत देण्यात याव्यात तर अन्य साडय़ांची विक्री शिक्षिका, समाज कल्याण खाते यासह विविध खात्यातील महिला कर्मचाऱयांना करण्यात यावी. महिला आणि बालकल्याण खात्याच्यावतीने दरवर्षी आठ ते दहा लाख साडय़ांची खरेदी विविध राज्यातून करण्यात येते. या ऐवजी साडी केंद्राद्वारे साडय़ांची खरेदी करण्यात यावी. राज्यातील वस्त्रोद्योग विकास निगमला साडी बँक स्थापन करण्यासाठी आणि साडय़ा खरेदी करण्यासाठी 300 कोटींचा आवर्त निधी देण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
उत्तर कर्नाटक विणकर विकास समितीचे अध्यक्ष रवी बाडगी, सचिव परशुराम ढगे, जिल्हा विणकर संघटनेचे उपाध्यक्ष निलकंठ मास्तमर्डी यांच्यासह नारायण कामकर, संजू इटनाळ, श्रीनिवास ताळुकर आदीसह अन्य उपस्थित होते.