प्रतिनिधी / बेळगाव :
महामारी कोरोनामुळे राज्यातील विणकर बांधवांच्या समस्यांबाबत हातमाग आणि वस्त्राsद्योग खात्याच्या आयुक्तांशी चर्चा करून निवेदन देण्यात आले आहे. उत्तर कर्नाटक विणकर विकास समिती, बेळगाव जिल्हा विणकर संघटना आणि उत्तर कर्नाटक विणकर विकास समितीच्या वतीने बेंगळूर येथील कार्यालयात जाऊन आयुक्त उपेंद्रसिंग यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे कार्यदर्शी शंकरगौडा पाटील उपस्थित होते.
लॉकडाऊनमुळे यंत्रमाग व्यवसाय संकटात आल्यामुळे राज्यातील विणकरांनी बनविलेल्या साडय़ांची खरेदी सरकारने करावी, खरेदी केलेल्या साडय़ा विणकर सहकारी संघाच्या द्वारे करण्याची व्यवस्था करावी, बेळगाव जिल्हा, बागलकोट जिल्हय़ासह बेंगळूर ग्रामीण, दोड्डबळ्ळापूर या ठिकाणी विणकर सहकारी संघाद्वारे साडी खरेदी आणि साडी बँक, तसेच हायपोथीकेशन पद्धतीने विणकरांकडून साडय़ांची खरेदी करण्यात यावी. या जिल्हय़ात विणकरांची संख्या सर्वाधिक असल्याने येथील विणकरांच्या सहकारी संघांना 75 कोटीचे अनुदान अथवा आवर्त निधी देण्यात यावा. यंत्रमाग उद्योगाच्या पुनश्चेतनासाठी विणकरांना कायमस्वरूपी मदत करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
राज्यातील यंत्रमाग विणकरांचे चार महिन्याच्या विजबिलात सवलत देण्यात यावी. राज्यातील गोर गरीब विणकरांच्या कुटुंबियांना 10 हजाराची मदत करण्यात यावी, चार महिन्याचे इएमआय माफ करण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे. याप्रसंगी उत्तर कर्नाटक विणकर विकास समितीचे अध्यक्ष रवि बाडगी, बेळगाव जिल्हा विणकर संघटनेचे सचिव परशुराम ढगे, बेळगाव जिल्हा विणकर संघटनेचे उपाध्यक्ष निलकंठ मास्तमर्डी आदी उपस्थित होते.