हलाखीच्या परिस्थितीतून टॉप 30 पर्यंतचा गाठला टप्पा
प्रतिनिधी / बेळगाव
मलप्रभानगर, वडगाव येथील एका विणकराचा मुलगा थेट सोनी टीव्हीवरच्या ‘सुपर डान्सर’च्या मंचावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे या शोसाठी संपूर्ण कर्नाटकातून जाणारा तो एकमेव मुलगा ठरला आहे. त्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून डान्सचे शिक्षण घेऊन टॉप 30 पर्यंतचा प्रवास गाठला आहे. त्यामुळे 9 वर्षांच्या पृथ्वीराज अशोक कोंगारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
डान्सच्या दुनियेतील एक महत्त्वाचा शो म्हणून सोनी टीव्हीवरील ‘सुपर डान्सर’ची ओळख आहे. नुकत्याच या शोच्या चौथ्या सिझनसाठी ऑडिशन पार पडल्या. देशभरातील 2 हजार 500 स्पर्धकांमधून प्रारंभी 150 नंतर 80, त्यानंतर विविध फेऱया होऊन टॉप 30 स्पर्धकांची निवड झाली आहे. यामध्ये बेळगाव येथील पृथ्वीराजची निवड करण्यात आली आहे. त्याचे वडील वडगाव परिसरात विणकर असून यंत्रमागावर काम करतात.
मागील शनिवारी व रविवारी झालेल्या शोच्या प्रसारणावेळी त्याने आपण बेळगाव येथून आल्याचे सांगितले. त्याने सादर केलेला डान्स पाहून परीक्षक अभिनेश्री शिल्पा शेट्टी, कोरिओग्राफर गीता कपूर व अनुराग बसू यांनी त्याचे कौतुक केले. पृथ्वीराजला बेळगाव येथील डान्स शिक्षक किरण कांबळे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.