दीड महिन्यात नेमणार गोवा वित्त आयोग
प्रतिनिधी/ पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल शुक्रवारी 15 व्या वित्त आयोगाची भेट घेऊन गोव्यासाठी रु. 6333 कोटींचे पॅकेज मागितले आहे. खाण अवलंबित व पर्यटन क्षेत्रासह, कृषी आणि अन्य क्षेत्रासाठी मिळून हे पॅकेज मागितल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. येत्या दीड महिन्यात गोवा राज्य वित्त आयोगाची नेमणूक केली जाणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, अन्य मंत्री व अधिकारी यांनी आयोगाची भेट घेतली. गोव्यात खाण बंदीमुळे कसा परिणाम झाला व दरवर्षी खाण अवलंबितांवर कसा पैसा खर्च केला. दरवर्षी 50 कोटी ते 70, 80 कोटी पर्यंतचा निधी खाण अवलंबितांवर सरकारने खर्च केला, अशी माहिती आयोगाला देण्यात आला. केवळ खाणबंदीमुळेच पॅकेज मिळायला हवे असे न मागता एकूणच कृषी, पर्यटन या सर्व गोष्टीसाठी मिळून सुमारे 6333 कोटींची पॅकेज मागितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. खाणी पुन्हा सुरु होईपर्यंत या लोकांची काळजी घेण्यासाठी आर्थिक मदत हवी आहे.
गोवा वित्त आयोग नेमणार
गोवा वित्त आयोगाची नेमणूक पुढील दीड महिन्याच्या कालावधीत केली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. 2016 मध्ये झा यांची नियुक्ती केली होती मात्र अधिकार न मिळाल्याने ते होऊ शकले नाही. आता पुढील दीड महिन्यात आयोगाची नेमणूक होणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विदेशी पर्यटकांबाबत आयोगाने मागितली माहिती
गोव्यात येणाऱया विदेशी पर्यटकांबाबत आयोगाने माहिती मागितली आहे. पर्यटन क्षेत्र हे असे आहे की त्यामुळे देशाला फायदा होतो. विदेशी चलन थेट देशाला प्राप्त होते. किती विदेशी पर्यटक गोव्यात येतात. ते किती दिवस राहतात याची माहिती मागितली आहे. समुद्रकिनारे, मंदिरे या व्यतिरिक्त हिटरलॅण्ड पर्यटनसाठीही वाव आहे. त्यामुळे त्यादृष्टीनेही सरकारने आयोगासमोर बाजू मांडली.