नवी दिल्ली / वृत्तसंस्था
विदेशात सरावासाठी किंवा स्पर्धेसाठी असाल त्यावेळी त्या देशातील प्रोटोकॉल्सचा भंग होणार नाही, याची काटेकोर काळजी घ्यावी, अशी सक्त सूचना क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी भारतीय क्रीडापटूंना केली. यंदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले भारतीय नेमबाज मंगळवारी क्रोएशियाला रवाना झाले. त्या पार्श्वभूमीवर रिजिजू यांनी सदर ट्वीट केले.
‘आपल्या सर्वांचा प्रवास सुरक्षित होवो, या सदिच्छा. विदेशातील कोव्हिड-प्रोटोकॉल अजिबात तोडू नका. आपल्या सरावावर पूर्ण लक्ष केंद्रित करा. काळजी घ्या आणि सुरक्षित रहा. आम्ही सर्व ऍथलिट व प्रशिक्षकांच्या पाठीशी आहोत. सर्वांना शुभेच्छा’, असे रिजिजू यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले.
काहीच दिवसांपूर्वी, ईगल्स एफसी संघाविरुद्धचा एएफसी चषक प्ले-ऑफ सामना बेंगळूर एफसीच्या खेळाडूंनी प्रोटोकॉल मोडल्यामुळे लांबणीवर टाकला गेला होता. त्या पार्श्वभूमीवर रिजिजू बोलत होते. या संघातील काही खेळाडू व साहायक पथकातील सदस्य क्वारन्टाईन नियम मोडत रस्त्यावरुन चालत असल्याची छायाचित्रे व्हायरल झाली. त्यानंतर मालदीवचे क्रीडामंत्री अहमद महलूफ यांनी बीएफसीला देश सोडण्याची सूचना केली होती. बेंगळूर एफसी संघाचे मालक पार्थ जिंदाल यांनी, नियमाचा भंग करणारे सदस्य विदेशी होते, असे नंतर नमूद केले. शिवाय, आपण त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले. सदर प्रोटोकॉलचा आपल्या सदस्यांकडून भंग झाल्याबद्दल क्लबने दिलगिरी व्यक्त केली होती.