एकूण 500 भारतीय खलाशांचे आगमन
प्रतिनिधी / वास्को
विविध देशांमध्ये अडकलेल्या सुमारे तीन हजार खलाशांना घेऊन ‘नॉर्वेजियन अँकर’ हे आंतरराष्ट्रीय जलमार्गावरील प्रवासी जहाज मुरगाव बंदरात दाखल झाले आहे. हे सर्व प्रवासी कोरोना महामारीमुळे विविध देशात अडकले होते. या जहाजात पाचशे खलाशी भारतीय होते. त्यापैकी 252 खलाशी गोमंतकीय असून त्यांची कोविड चाचणी घेऊन त्यांना घरी जाऊ देण्यात आले आहे. इतर खलाशी महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक राज्यातील आहेत.
कोविड महामारीमुळे आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यवसाय ठप्प झाल्याने मागच्या वर्षभरापासून विविध देशात विविध जहाजांच्या सेवेत असलेल्या खलाशांना मायदेशी आणण्यात आले आहे. नुकतेच नॉर्वेजियन अँकर हे तीन हजार खलाशांना घेऊन भारतात आलेले जहाज मुरगाव बंदरात दाखल झाले. या खलाशांपैकी 252 गोमंतकीय खलाशांची कोविड चाचणी करण्यात आली. चाचणीच्या अहवालानंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आले. यापूर्वी हेच जहाज 183 गोमंतकीय खलाशांना घेऊन मुरगाव बंदरात दाखल झाले होते. जहाजातील उर्वरीत खलाशी इतर देशातील असून त्यांना त्यांच्या राज्यात रवाना करण्यात येणार आहे. या जहाजात भारतीय खलाशांबरोबरच युरोप, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, जपान, हाँगकाँग आदी देशातील खलाशी होते.