वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय महिला फुटबॉल संघातील महत्त्वाची फुटबॉलपटू बाला देवीने आपली व्यवसायिक फुटबॉल कारकीर्द घडविण्यासाठी विदेशातील फुटबॉल क्लबबरोबर करार केला आहे. आता बाला देवीच्या पावलावर पाऊल ठेवून देशातील अनेक महिला फुटबॉलपटू विदेशात खेळण्यासाठी इच्छुक असल्याचे वैयक्तिक मत भारतीय महिला फुटबॉल संघाची गोलरक्षक अदिती चौहानने व्यक्त केले आहे.
2022 साली होणाऱया फिफाच्या 17 वर्षांखालील वयोगटाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भारत भूषवित आहे. त्याचप्रमाणे 2022 सालातील एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धा भारतात होणार असल्याने देशातील महिला बालाचे अनुकरण करण्यास प्रयत्नशील असतील, अशी अशा अदितीने व्यक्त केली आहे. गेल्यावर्षी बाला देवीने युरोपमधील व्यावसायिक महिलांच्या लीग स्पर्धेत खेळण्यासाठी एका फुटबॉल क्लबशी करार केला होता. बाला देवी सध्या स्कॉटीश प्रिमियर लीग स्पर्धेत ग्लॅस्गोच्या रेंजर्स फुटबॉल क्लबचे प्रतिनिधीत्व करीत आहे. या घटनेनंतर भारताच्या राष्ट्रीय महिला फुटबॉल संघात स्थान मिळविण्यासाठी देशातील महिला फुटबॉलपटू अधिक प्रमाणात प्रयत्न करीत आहेत. भारतातील महिला फुटबॉलपटूंना प्रतिस्पर्धी दर्जेदार संघाबरोबर खेळण्याची अधिक संधी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील, असे 27 वर्षीय अदिती चौहानने म्हटले आहे. 2015 ते 2018 या कालावधीत अदितीने इंग्लंडमधील वेस्ट हॅम महिला संघातून अनेक सामने खेळले आहेत. युरोपमध्ये व्यावसायिक फुटबॉलचा दर्जा, संस्कृती पूर्णपणे वेगळी असून बाला देवीला तेथे मिळणारा अनुभव भारतीय संघालाही उपयुक्त ठरणार आहे, असे अदिती म्हणते. 2012 साली फुटबॉल क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर अदितीने 15 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे.