अमेरिका, युएई अन् सौदीला सर्वाधिक पसंतीः संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल
वृत्तसंस्था / संयुक्त राष्ट्रसंघ
विदेशात वास्तव्यप्रकरणी भारतीयांचे स्थान जगात पहिल्या स्थानावर पोहोचले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालानुसार 2020 मध्ये देशाबाहेर राहणाऱया लोकांची संख्या 18 दशलक्ष म्हणजेच 1 कोटी 80 लाख इतकी राहिली आहे. भारताचे सर्वाधिक लोक संयुक्त अरब अमिरात (युएई), अमेरिका आणि सौदी अरेबियात राहतात.
संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक आणि सामाजिक विषयक विभागाच्या (युएन-डीईएसए) जनसंख्या शाखेकडून प्रसिद्ध ‘इंटरनॅशनल मायग्रेशन 2020 हायलाइट्स’ या अहवालात आंतरराष्ट्रीय लोकसंख्येचे पलायन अत्यंत वेगळे असते आणि जगात सर्वाधिक भारतीय स्थलांतरित असून ते अनेक देशांमध्ये राहत असल्याचे म्हटले गेले आहे. भारतानंतर मेक्सिको आणि रशिया (दोघांचे प्रत्येकी 1.1 कोटी), चीन (1 कोटी) आणि सीरिया (80 लाख)चे लोक अन्य देशांमध्ये राहतात. दुसऱया देशांमध्ये राहत असलेल्या भारतीयांचे सर्वाधिक प्रमाण संयुक्त अरब अमिरात (35 लाख), अमेरिका (27 लाख), सौदी अरेबिया (25 लाख)मध्ये आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कुवैत, ओमान, कतार आणि ब्रिटनमध्येही स्थलांतरित भारतीयांची लक्षणीय लोकसंख्या आहे.
कोरोनाकाळात वेग घटला
मागील वर्षी महामारीमुळे अन्य देशांमध्ये जाऊन तेथे स्थायिक होण्याचा वेग कमी झाला आहे. महामारीदरम्यान यात 27 टक्क्यांची घट झाली आहे. सद्यकाळात आंतरराष्ट्रीय स्थलांतरितांची संख्या जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 3.6 टक्के आहे. तर 2000-2020 या कालावधीत 179 देशांमध्ये स्थलांतरितांच्या संख्येत वाढ झाली आहे. तर यादरम्यान 53 देशांमध्ये स्थलांतरितांची संख्या कमी झाली आहे. यात आर्मेनिया, भारत, पाकिस्तान, युक्रेन आणि टांझानिया सामील आहे.
1 कोटी विदेशात स्थायिक
2000 सालच्या तुलनेत 2020 मध्ये विदेशांमध्ये स्थलांतरित लोकसंख्येत वेगाने वाढ झाली आहे. जगातील सर्व देश आणि क्षेत्रांमध्ये यात वृद्धीची नोंद झाली आहे. या कालावधीत भारतातील 1 कोटी लोक विदेशात स्थायिक झाले आहेत. यानंतर सर्वाधिक सीरिया, व्हेनेझुएला, चीन आणि फिलिपाईन्सचे लोक विदेशात जाऊन राहिले आहेत.
अमेरिकेला पहिली पसंती
अमेरिका 51 दशलक्ष स्थलांतरितांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर जगातील लोकांसाठी पहिली पसंती ठरला आहे. अमेरिकेत राहणारे स्थलांतरित जगातील एकूण स्थलांतरितांच्या संख्येच्या 18 टक्के इतके आहेत. जर्मनीत जगातील स्थलांतरितांची दुसरी सर्वात मोठी संख्या (16 दशलक्ष) वास्तव्यास आहे. तर सौदी अरेबियात (13 दशलक्ष), रशिया (12 दशलक्ष) आणि ब्रिटन (9 दशलक्ष)मध्येही हा आकडा अधिक आहे.