भांडवली बाजारात गुंतवणुकीने उत्साह
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी (एफपीआय) 1 ते 12 जून या कालावधीत भारतीय भांडवली बाजारामध्ये 20,574 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जागतिक बाजारात रोखीवता वाढल्याने विदेशी गुंतवणूकदार बाजारात पैसे गुंतवत आहेत. याच्या आधारेच भारतीय बाजारातील विदेशी गुंतवणुकीत वाढ नोंदवण्यात आली आहे.
गुंतवणुकीच्या ताज्या आकडेवारीनुसार याच कालावधीत एफपीआयने भारताच्या शेअर बाजारामध्ये 22,840 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक केली आहे. याच दरम्यान त्यांनी डेट बाजारात 2,266 कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली आहे. दोन्ही मिळून या कालावधीत भारतीय भांडवली बाजारात (शेअर आणि डेट बाजार) 20,574 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
मार्च, एप्रिल आणि मे या कालावधीत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातील भांडवल काढून घेतले होते. कोविडच्या संकटातून सावरण्यासाठी विविध प्रकारच्या मदतीसाठी प्रत्येक देशाची यंत्रणा काम करत आहे. यामुळे जागतिक बाजारात रोखीवता उभी करण्यास ताकद मिळाली असल्याचे पहावयास मिळाले आहे. सदरच्या आर्थिक मदतीने आगामी काळातही विविध देशांची आर्थिक स्थिती सुधारण्यास गती मिळणार आहे.