वृत्तसंस्था /नवी दिल्ली :
भारताचा विदेशी चलन भांडर 11 सप्टेंबर रोजी समाप्त झालेल्या आठवडय़ात 35.3 कोटी डॉलर्सने कमी होत 541.660 अब्ज डॉलर्सवर आला आहे. तर 4 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवडय़ात हे प्रमाण 58.2 कोटी डॉलर्सने वाढून 542.013 अब्ज डॉलर्सवर पोहोचले होते. यंदा 5 जून रोजी संपलेल्या आठवडय़ात देशाचा विदेशी चलन भांडार पहिल्यांदाच 500 अब्ज डॉलर्सच्या पार पोहोचला होता.
11 सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवडय़ादरम्यान एफसीएमध्ये 84.1 कोटी डॉलर्सची घट झाल्याने विदेशी चलन भांडारावर प्रभाव दिसून आला आहे. एफसीएमध्ये डॉलर्स वगळून युरो, पौंड आणि अन्य चलनांच्या भांडारातील उतार-चढाव सामील केला जातो. याची गणना देखील डॉलर्सच्या मूल्यातच केली जाते. समीक्षाधीन आठवडय़ाच्या अखेरीस देशाचा सुवर्णसाठा 49.9 कोटी डॉलर्सने वाढून 38.02 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.
याचबरोबर आंतरराष्टीय नाणेनिधीकडून मिळालेला एसडीआर 10 लाख डॉलर्सने कमी होत 1.482 अब्ज डॉलर्स झाला आहे. नाणेनिधीकडे जमा देशाचा विदेशी चलन भांडार 1.1 कोटी डॉलर्सने कमी होत 4.637 अब्ज डॉलर्स राहिला आहे.
भारताचा विदेशी चलन भांडार 537 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढला असून तो 19 महिन्यांच्या आयातीसाठी पुरेसा असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत म्हटले होते. तसेच कोरोना महामारीमुळे महसुलात झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सरकार कराचा दर वाढविण्याचा विचार नाही. राज्यांच्या जीएसटीच्या भरपाईच्या मुद्दय़ावर जीएसटी परिषदेत विचारविनिमय केला जाणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले आहे.