वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताच्या विदेशी चलन साठय़ात मोठी वाढ झाली आहे. 11 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवडय़ात विदेशी चलन साठय़ात 14.72 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. आरबीआयनुसार विदेशी चलन साठा 544.71 अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. यापूर्वी 4 नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवडय़ात विदेशी चलन साठा 1.09 अब्ज डॉलर्सने कमी होत 529.99 अब्ज डॉलर्सवर आला होता.
अलिकडच्या काळात आरबीआयने डॉलरची मोठी खरेदी केली आहे. याचमुळे डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरणीला बेक लागला आहे. अशातच पुनर्मूल्यांकनातील फरकामुळे विदेशी चलन साठय़ात वाढ झाली आहे. भारताचा विदेशी चलन साठा मार्च महिन्यात 607 अब्ज डॉलर्स इतका होता. 3 सप्टेंबर 2021 रोजी हा आकडा 642.45 अब्ज डॉलर्स इतका होता.
मागील 13 आठवडय़ांपैकी 11 आठवडय़ांमध्ये विदेशी चलन साठय़ात घसरणीची नोंद झाली आहे. महागडी आयात आणि रशिया-युक्रेन युद्धापासून सातत्याने विदेशी चलन साठय़ात घसरण होत होती.