सेन्सेक्स 1375 अंकांनी तर निफ्टी 379 अंकांनी घसरला
वृत्तसंस्था / मुंबई
कोरोना विषाणूचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँकेकडून घेण्यात आलेल्या निर्णयामुळे देखील सोमवारी बाजारात घसरण सुरूच राहिली. शुक्रवारच्या घसरल्यानंतर देशातील बाजार सोमवारी घसरणीत बंद झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1375.27 अंकांच्या घसरणीसह 28,440.32 अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीदेखील 379.15 अंकांनी घसरून 8,281.10 अंकांवर बंद झाला.
मागील व्यापारी दिवसाच्या तुलनेत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 4.61 टक्के आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 4.28 टक्क्यांनी खाली आला. मुंबई शेअर बाजार निर्देशांकातील दोन क्षेत्र वगळता बाकीच्या क्षेत्रांमध्ये घसरण नोंदविण्यात आली. मुंबई शेअर बाजारातील जवळपास 55 टक्के कंपन्यांचे समभाग घसरले. देशांतर्गत बाजारात विदेशी बाजार घसरण्याचा दबाव कायम राहिला. मुंबई शेअर बाजारातील 2,453 कंपन्यांच्या समभागाची विक्री झाली. यामध्ये 931 कंपन्यांचे समभाग वधारले तर 1,350 कंपन्यांचे समभाग घसरले. 25 कंपन्यांचे समभाग 1 वर्षाच्या उच्चांकावर आणि 326 कंपन्यांचे समभाग 1 वर्षाच्या नीचांकी पातळीवर राहिले.
विदेशी बाजारपेठेतही घसरण
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगातील अन्य बाजारही तोटय़ात व्यापार करीत आहेत. ब्रिटनचा एफटीएसई 81.35 अंकांनी घसरत 5,429.90 अंकांवर सुरू झाला. फ्रान्सचा सीएससी 76.52 अंकांनी घसरून 4,274.96 अंकांवर स्थिरावला. जर्मनीचा डीएएक्स 71.27 अंकांनी खाली येत 9,561.25 अंकांवर सुरू झाला. त्याचप्रमाणे इटलीचा एफटीएसई एमआयबीदेखील 90.59 अंकांनी खाली येऊन 16,732 अंकांवर स्थिरावला. आशियातील इतर बाजार देखील घसरणीत होते. दक्षिण कोरियाचा कोस्पी, चीनचा शांघाई, जपानचा निक्की आणि हाँगकाँगचा हँगसँगही घसरले.
शुक्रवारही बाजारासाठी अस्थिर
आठवडय़ाच्या शेवटचा दिवस शुक्रवार भारतीय शेअर बाजारासाठी अस्थिर राहिला होता. शुक्रवारी सेन्सेक्स 131.18 अंकांनी घसरत 29,815.59 अंकांवर बंद झाला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात 0.75 टक्क्यांची कपात केल्यानंतरही बाजारात वाढ दिसून आली नाही. यापूर्वी गुरुवारी सेन्सेक्स 1410.99 अंकांनी वधारून 29,946.77 अंकांवर बंद झाला. तर निफ्टीने 323.60 अंकांची वाढ नोंदवत 8,641.45 अंकांवर कामगिरी केली होती.