उत्तराखंडमध्ये राजराजेश्वरी देवीचे मंदिर
उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीसह अशी अनेक मंदिरे आहेत, जेथे देशातीलच नव्हे तर विदेशी भक्तही पोहोचतात. असेच एक मंदिर आहे देवलगढचे राजराजेश्वरी सिद्ध पीठ. हे मंदिर श्रीनगर गढवालपासून 18 किलोमीटर अंतरावर असून ते वर्षभर भाविकांसाठी खुले असते. तेथे गौरादेवीची पूजा केली जाते.
राजराजेश्वरी सिद्धपीठात येणाऱया भक्तांची धन, वैभव, सुखसमृद्धीची मनोकामना माता पूर्ण करते. या ठिकाणी गौरादेवीने लोककल्याणासाठी तप केला होता अशी मान्यता आहे. जुन्या काळापासूनच राजराजेश्वरी गढवालच्या राजाची कुलदेवी आहे. 1512 मध्ये गढवालचा राजा अजयपाल यांनी देवलगढला राजधानीचा दर्जा दिला होता. या मंदिरात महिषमर्दिनी आणि कामेश्वरी यंत्र स्थापित करण्यात आले आहे.
गौरादेवीचे देशविदेशात भक्त आहेत. भक्तांच्या मागणीवर मंदिराकडून पोस्टच्या माध्यमातून होम-यज्ञाची भभुत म्हणजेच भस्म पाठविले जाते. विदेशात सौदी अरेबिया, ऑस्ट्रेलिया, लंडन, अमेरिका यासारख्या देशांमध्ये देवीचे अनेक भक्त आहेत.
राजराजेश्वरी मंदिर उंचीवर स्थित असून दरवर्षी एप्रिलमध्ये येथे मेळा भरतो. हे मंदिर शेकडो वर्षे जुने असून त्यावर गढवाली स्थापत्यकलेची छाप दिसून येते. मंदिराच्या परिसरातील नैसर्गिक वातावरण तेथे येणाऱया भक्तांना वेगळीच अनुभूती देते. मंदिरासाठी सर्वात जवळचे विमानतळ देहरादूनचे जॉली ग्रांट असून तेथून मंदिराचे अंतर सुमारे 160 किलोमीटर आहे. येथून जवळचे रेल्वेस्थानक कोटद्वार सून मंदिरापासून सुमारे 135 किलोमीटर अंतरावर आहे.