वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रॉ आणि सैन्यप्रमुखांनंतर आता विदेश सचिव देखील नेपाळच्या दौऱयावर जाणार आहेत. भारतीय विदेश सचिव हर्षवर्धन श्रृंगला 26 आणि 27 नोव्हेंबर रोजी नेपाळची राजधानी काठमांडू येथे असणार आहेत. या दौऱयादरम्यान ते नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची भेट घेणार आहेत. याचबरोबर नेपाळचे विदेशमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांशीही त्यांची चर्चा होणार
आहे.
काही दिवसांपूर्वीच भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉचे प्रमुख सामंत कुमार गोयल यांनी नेपाळचा दौरा केला होता. त्यानंतर सैन्यप्रमुख जनरल नरवणे यांनी नेपाळला भेट दिली होती.
नेपाळचे विदेश सचिव भरत राज पंडित यांनी भारताच्या विदेश सचिवांना दौऱयाचे निमंत्रण दिले आहे. दोन्ही देशांमधील उच्चस्तरीय चर्चेच्या साखळीतील हे पुढचे पाऊल आहे. या चर्चेमुळे दोन्ही देशांचे संबंध वृद्धिंगत करण्यास मदत होईल असे नेपाळने म्हटले आहे.