वार्ताहर/ कराड
हिंदू एकता विद्यार्थी सेनेच्या वतीने ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थांनी एस.जी.एम. कॉलेजच्या प्रवेशव्दारात गोंधळ घातला. यावेळी 100 हुन अधिक विद्यार्थांचा जमाव जमल्याने कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाअध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह सात ते आठ जणांविरोधात कराड शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान विक्रम पावसकर यांच्या उपस्थीतीत विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांना निवेदन देण्यात आले.
कोरोना संकट सुरू झाल्यापासुन सर्वच ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू होते. अध्याप काही ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. अकरावी आणी बरावीत शिकणाऱया विद्यार्थीही दोन वर्षांपासुन ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थांना मोबाईल उपलब्द न झाल्याने व नेटवर्क नसल्याने ऑनलाइन अभ्यासक्रमांमध्ये अनियमितता आली आहे. याचा विचार करता दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्याव्यात, अशी मागणी हिंदू एकता विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबतचे निवेदन महाविद्यालयांच्या प्राचार्यांना देण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर विद्यानगर परिसरात आले होते. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास ते कृष्णा कॅनॉलवरती कारमधून उतरले. त्यानंतर कॉलेज रस्त्याने चालत जात असताना विद्यार्थ्यांचा मोठा जमाव जमा झाला. यावेळी जमावाने विविध प्रकारच्या घोषणा दिल्या. एस.जी.एम.कॉलेजच्या प्रवेशव्दारात मोठया प्रमाणात विद्यार्थांचा जमाव जमल्याने कॉलेज प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने जमावाला गेटवरती रोखले. ओगलेवाडी पोलिस दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांनी विद्यार्थांना कोरोनाच्या नियमांचे पालक करण्याचे आवाहन केले.
कॉलेज प्रशासनाने जमावातील विद्यार्थांच्या ओळखपत्रांची पडताळणी केली असता यातील बहुतांष विद्यार्थी हे एस.जी.एम.कॉलेजचे नसल्याचे समोर आले आहे. कॉलेज प्रशासनाने याबाबत पोलिस प्रशासनाला माहिती दिली आहे. पोलिसांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे यासाठी जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला. तसेच विक्रम पावस्कर यांच्यासह पाच ते सहा जणांना कॉलेजच्या कॅम्पसमध्ये घेऊन प्राचार्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर संबंधितांनी विद्यानगर परिसरातील विविध महाविद्यालयांना आपल्या मागण्याचे निवेदन दिले. यावेळी विक्रम पावसकर यांच्यासह रुपेश मुळे व हिंदू एकता विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष रोहित माने उपस्थित होते.
शासनाच्या सुचनेनुसार पुढील कारवाई दरम्यान, निवेदन स्वीकारल्यानंतर प्राचार्य डॉ. मोहन राजमाने यांनी सदरची मागणी शिक्षणअधिकारी व शासनापर्यंत पोहचवण्यात येईल व शासनाच्या सुचनेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे अश्वासन दिले.