प्रा सुभाष वेलिंगकर यांचा आरोप
प्रतिनिधी / पणजी
पर्वरी येथील विद्याप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कारभारात राजकारण घुसवण्याचा प्रयत्न चालू आहे तसेच सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून सदर संस्था ताब्यात घेण्याचा भारतीय जनता पक्षातील काही राजकारण्याचा मनसुबा असल्याचे सदर संस्थेचे सचिव प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.
विद्याप्रबोधिनीच्या विद्यमान कार्यकारी समितीने निवडणूका होईपर्यंत दैनंदिन कारभार पहावा पण धोरणात्मक व मोठ आर्थिक निर्णय घेऊ नये, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने यापूर्वी दिला होता. याचा अर्थ सदर कार्यकारी समिती अस्तित्त्वात असल्याचे न्यायालयालाही मान्य आहे.
खंडपीठाने निवाडा देताना 22 नव्या सदस्यांची नियुक्ती अमान्य केली त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. तसेच 7 दिवसांच्या आत निवडणूक घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश दिला होता असे ते म्हणाले.
या आदेशानुसार 28 जून 2020 रोजी आम सभा बोलावण्यात आली व करोनाच्या काळात ती घेण्यात जिल्हाधिकाऱयाकडे मान्यता मागण्यात आली. तरी असताना विद्यमान कार्यकारी समातीने 7 दिवसांच्या आत निवडणूका घेतल्या नसल्याचा आरोप लावून जिल्हा प्रबंधक सोनिया हळर्णकर यांनी नोटीस बजावून सदर कार्यकारी समिती कालबाहय़ ठरवून आता 25 जून 2020 रोजी आमसभा बोलावली आहे व त्यासभेची तयारी करण्याचे आदेश उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्यांना दिला आहे अशी माहिती त्यांनी दिली.