परिवहनमंत्री श्रीरामुलू यांच्या आदेशानंतर व्यवस्था
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग 23 ऑगस्टपासून सुरू झाले आहेत. मात्र, विद्यार्थ्यांना राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास करण्यासाठी अनुकूल व्हावे, यासाठी कोणताही आदेश देण्यात आला नव्हता. अखेर मंगळवारी परिवहन मंत्री बी. श्रीरामुलू यांनी दिलेल्या आदेशावरून सेवा सिंधू पोर्टलवर मंगळवारपासूनच विद्यार्थ्यांना सवलतीच्या दराने बसपास वितरण करण्यास प्रारंभ झाला आहे. बसपाससाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
विधानसौध येथे बी. श्रीरामुलू यांनी मंगळवारी परिवहन खात्याची प्रगती आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्याना ऑनलाईनद्वारे पास वितरीत करण्याची सूचना अधिकाऱयांना दिली. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्य संपर्क अधिकाऱयांनी आदेशपत्रक जारी करत सेवा सिंधू पोर्टलवर 2021-22 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी बसपाससाठी अर्ज भरणा प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती दिली.
विद्यार्थ्यांच्या अनुकूलतेसाठी सेवा सिंधू पोर्टलमध्ये आणखी सुधारणा करण्यात आली असून मोफत आणि सवलतीच्या दराने बसपास वितरणाला प्रारंभ केला आहे. शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी याचा सदुपयोग करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग सोमवारपासून सुरू झाले आहेत. बेंगळूरमध्ये बीएमटीसीने विद्यार्थ्यांना जुने पास किंवा शाळेत शुल्क भरल्याची पावती दाखवून बस प्रवास करण्याची मुभा दिली होती. मात्र, केएसआरटीसीकडून राज्यातील इतर भागातील विद्यार्थ्यांसाठी तशी सुविधा उपलब्ध करून दिली नव्हती. आता परिवहन मंत्र्यांच्या आदेशावरून बसपास वितरण व्यवस्थेला प्रारंभ करण्यात आला आहे.