आमदार सुदिन ढवळीकर यांची सूचना
प्रतिनिधी /फोंडा
दहावीची परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णय 60 टक्के व त्याहून अधिक गुण मिळविणाऱया हुशार विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणाकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता अधिक आहे. परीक्षाच रद्द करण्यापेक्षा येत्या महिन्याभरात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण प्राधान्यक्रमाने करून जुलै महिन्यात परीक्षा घेणे शक्य आहे, अशी सूचना मगो नेते आमदार सुदिन ढवळीकर यांनी मुख्य़मंत्र्यांना केली आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे कारण पुढे करीत गोवा सरकारनेही परीक्षा रद्द केलेल्या आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होऊ शकतो. इतर राष्ट्रांनी दहा व चौदा वर्षांवरील मुलांचे लसीकरण सुरु केले आहे. गोव्यात दहावी व बारावीच्या परीक्षेला बसणारे विद्यार्थी वीस हजाराहून जास्त नाहीत. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान व केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना विनंती करून गोव्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचे जूनच्या पहिल्या आठवडय़ापासून लसीकरण करण्याची व्यवस्था करावी. विद्यार्थ्यांना पहिला डोस दिल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत परीक्षा घेता येईल. चोख नियोजन केल्यास 25 जुलैपर्यंत बोर्डाच्या या दोन्ही परीक्षा पूर्ण होऊ शकतात, असे मत सुदिन ढवळीकर यांनी मांडले आहे. दहावी व बारावी हा शैक्षणिक भवितव्याचा महत्त्वाचा टप्पा असल्याने परीक्षा न होताच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास त्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर परिणाम होण्याची भितीही त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, अठरा वर्षांवरील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचेही तातडीने लसीकरण हाती घेण्याचा निर्णय सरकारने घेणे आवश्यक आहे. गोव्यासारख्या राज्यात हे शक्य आहे. शिवाय इतर राज्यांसाठी तो चांगला पायंडा ठरू शकतो. कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक ठरू शकते असे सांगितले जाते. त्यापूर्वीच परीक्षेनिमित्त शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यास त्यांना कोरोनापासून सुरक्षा मिळेल, असेही सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.